लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : परिसरात गेल्या काही महिन्यापासून कुत्र्यांना ‘खरुज’ या रोगाची लागण झालेली आहे. त्यामुळे कुत्र्यांच्या जीवावर उठलेल्या या रोगाची बाधा नागरिकांनाही होत असून खाज सुटलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ग्रामीण रुग्णालयात या रुग्णांची मोठी संख्या वाढली असली तरी त्यांना रुग्णालयात औषधी उपलब्ध नसल्याने यात्रा त्रास होत आहे. ग्रामीण रुग्णालयात मागील दोन महिन्यांपासून ६२ प्रकारच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे.आखाडा बाळापूर परिसरात मागील सहा महिन्यांपासून कुत्र्यांना खरुज या रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांमध्ये दू्रतगतीने या रोगाची लागण झाली आहे. त्यांच्या अंगावरील केस गळून पडले असून जखमा झाल्या आहेत. त्याशिवाय त्वचा आखल्यामुळे अनेक कुत्री मृत्यूमुखीही पडले आहेत. खाजेमुळे हैराण झालेले व त्वचेवर ठिकठिकाणी जखमी झालेले कुत्रे घरामध्ये घुसण्याचा, पाण्यात, डोहात बुडून बसण्याचा प्रयत्न करीत आहेत. या कुत्र्यांच्या खरुज रोगाची बाधा माणसांना ही होत आहे. जवळपास बसलेल्या या रोगीट कुत्र्यांच्या खरुजेची बाधा माणसांना होत असल्याने अंगाला खाज सुटलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. अशा रुग्णांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली आहे. या रुग्णांना खाजेवर औषधी मात्र उपलब्ध होत नाहीत.याबाबत रुग्णांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली असता औषधींचा तुटवडा असल्याचे सांगण्यात आले. याबाबत प्रशासनाला विचारले असता गेल्या दोन महिन्यांपासून औषधींचा तुटवडा निर्माण झाल्याचे सांगितले. ८३ प्रकारच्या औषधांचा शासकीय दवाखान्यांना औषधी पुरवठाकेला जातो. परंतु गत दीड महिन्यापासून ६२ प्रकारच्या औषधींचा पुरवठा मराठवाडाभर बंद असल्याचेही औषध निर्माण अधिकाऱ्यांनी सांगितले. काही औषधे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मागवली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.ताप, सर्दी, खोकला यासह खाज असल्याच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून त्यांना औषधी मात्र उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.
कुत्र्याच्या खरुजेची माणसांना बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:34 PM