जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या वतीने हिंगोली, वसमत, कळमनुरी येथे क्वाॅरण्टाइन सेंटर उभाण्यात आले आहे. कोरोना संशयित रुग्णांना यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येते. हिंगोली येथे औंढा रोडवरील वसतिगृहामध्ये क्वाॅरण्टाइन सेंटर उभारण्यात आले आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आता तर ही इमारत रुग्णांअभावी कुलूपबंद असल्याचे १५ जानेवारी रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास पहावयास मिळाले. क्वाॅरण्टाइन सेंटरमध्ये जाऊन पाहणी केली असता काही बेडसीट आदी साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले, तर खोल्यातील खाटा धुळीने माखलेल्या होत्या. उपचारासाठी रुग्णच नसल्याने इमारतही कुलूपबंद ठेवण्यात येत आहे. विशेष म्हणजे येथे एकही आरोग्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून आले. केवळ सुरक्षारक्षकावरच सेंटरची मदार असल्याचे दिसून आले.
एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागात सतर्क असताना क्वाॅरण्टाइन सेंटरच बंद असल्याने आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
कोविड रुग्णालयात २८ रुग्णांवर उपचार
औंढारोडवरील कोविड रुग्णालयात दि. १५ जानेवारी रोजी २८ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी दिली. या रुग्णालयात एकूण ३३ रुग्ण भरती करण्यात आले होते, तर यातील पाच रुग्ण ठणठणीत झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून, आता केवळ २८ रुग्ण उपचार घेत आहेत.