हिंगोली जिल्ह्यात गावोगाव फिरते, बंगाली, चांदसी अथवा इतर अनेक डॉक्टर कोणतीही पदवी नसताना कार्यरत आहेत. मात्र तात्पुरती गरज भागते म्हणून ग्रामस्थ त्यांची तक्रार करीत नाहीत. त्यामुळे या डॉक्टरांचे फावते. काही ठिकाणी अशा डॉक्टरांच्या तक्रारीही झाल्या. मात्र तेथे जाऊन कारवाई करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीत आरोग्य विभाग, महसूल, पोलीस, पं.स. अशा अनेक विभागांचा समावेश आहे. मात्र यातील नेमकी काय जबाबदारी पार पाडायची यावरूनच संभ्रमावस्था असल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांना आपोआपच अभय मिळत आहे. याबाबत प्रशासनाने कोरोना काळात तर ग्रामपंचायतींनाच पत्र देऊन त्यांनीच असा कोणी डॉक्टर असल्यास कळवावे. अथवा त्याला प्रॅक्टिस करू देऊ नये, असे सांगण्यात आले. मात्र गावपातळीवर संबंध जपण्यासाठी अशा कोणी तक्रारीच करीत नाही. आता लोहरा येथील प्रकरणात तर डिग्रीवरच शंका आहे. जर ही डिग्री बोगस असेल तर त्याची पुढील चौकशी करायची कोणी ? हा प्रश्न आहे. काही काळ अजून गेला तर हे प्रकरणही पडद्याआड जाऊ शकते. जिल्ह्यात प्रशासनाने अधिकृतरीत्या जाहीर केलेला बोगस डॉक्टरांचा चार हा आकडा अतिशय हास्यास्पद आहे. यावर प्रशासनाने आणखी काम करण्याची गरज आहे. ग्रामपंचायतींवर जबाबदारी सोपवून मोकळे झाल्यास हा प्रकार आणखी फोफावणार असल्याचे दिसते.
बोगस डॉक्टरांचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 4:20 AM