आखाडा बाळापूर : आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या निवासस्थानांची अवस्था जर्जर झालेली असून, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस अधीक्षकांच्या पाहणीनंतर विशेष पोलीस महानिरीक्षकांनीही आखाडा बाळापूर येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्प वसाहतीतील गाळ्यांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी आज विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी केली. गेल्याच आठवड्यात जिल्हा पोलीस अधीक्षकांची वार्षिक तपासणी झाली होती. त्यानंतर लगेचच ही तपासणी आल्यामुळे बाळापूर ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना उसंत नव्हती. ठाण्याची वार्षिक तपासणी केल्यानंतर नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी बाळापूर ठाण्याच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. बाळापूर ठाणे परिसर या दिवसांमध्ये स्वच्छ करून सर्वत्र टापटीप ठेवण्यात आला होता. जवळपास दोन तास ठाणे परिसराची पाहणी करून तांबोळी यांनी गुन्ह्यांच्या निकालाचा आढावा, तपासाच्या दिशा याबाबत चर्चा करून मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी हाश्मी उपस्थित होते. निवास्थानांचा प्रश्न सोडविण्यास आज पुन्हा तांबोळी यांनी इरिगेशन वसाहतीची पाहणी केली. किती गाळे चांगले आहेत, याची चाचपणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना गाळ्यांची तपासणी करून त्यांच्या उपयुक्ततेचा अहवाल घेतल्यानंतर पुढील दिशा ठरविण्यात येईल, असेही तांबोळी यांनी यावेळी सांगितले.