हिंगोली जिल्ह्यात आता रुग्णसंख्या घटत चालली आहे. मात्र, तरीही लसीकरण व कोरोना तपासणीचा वेग काही वाढत नव्हता. त्यातच चाचण्यांअभावी अचानक उद्रेकाची परिस्थिती उद्भवू नये, यासाठी प्रशासन प्रयत्न करताना दिसत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तर सर्व आस्थापनांना कोरोना चाचणीशिवाय व्यवसाय करण्यासाठीही बंदी घातली आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत कोरोना चाचणीच्या प्रमाणपत्रांची तपासणी होत आहे. कळमनुरीत तर पोलीस बंदोबस्तात नगरपरिषदेने तपासणी केली. यात ज्या दुकानदारांनी चाचणी केली नाही, अशांच्या दुकानांना सील ठोकले.
हिंगोलीतही शनिवारी ज्या आस्थापनांना परवानगी आहे, अशांची तपासणी करण्यात आली. तर ज्यांना परवानगी नाही, त्यांनीही दुकाने उघडी ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पाच दुकाने बंद करून त्यांना कोरोना चाचणी करण्यास पाठविण्यात आल्याचे स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांनी सांगितले. तसेच फुटकळ व्यापारी व हातगाड्यांवरील विक्रेत्यांचीही तपासणी करून कोरोना चाचणी नसल्यास तपासणीस पाठविले.
बंदीची दुकानेही उघडीच
शनिवार व रविवारी काही ठरावीक आस्थापनांनाच परवानगी असताना त्यांनी दुकाने उघडी ठेवल्याचे आढळून आले. त्यामुळे काय बंद आणि काय सुरू याचा ताळमेळच दिसत नव्हता.
तर दुकान उघडू देणार नाही
जर सोमवारी कोरोना निगेटिव्हचे प्रमाणपत्र दुकान मालक व कामगारांनी सोबत ठेवले नाही तर दुकान उघडूच दिले जाणार नाही. पुढील काळातही अशा दुकानांना सील ठेवण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी दिला.