- प्रविण नायकसवना (जि.हिंगोली) : रब्बी हंगाम सुरू होवून महिनाही उलटला नाही तोच जिल्ह्यात वीजप्रश्न गंभीर बनला आहे. वर्षातून किमान रब्बीत तीन महिने तरी वीज पुरवठा सुरळीत ठेवावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत न ठेवता बिलाची सक्तीने वसूली केली जात आहे. त्यामुळे सेनगाव तालुक्यातील सुरजखेडा येथील शेतकऱ्यांनी वीज कंपनीच्या टॉवरवर चढून आंदोलन केले.
सेनगाव तालुक्यातील सुजरखेडा येथे मागील अनेक दिवसांपासून शेतीसह गावठाणमध्ये वीज प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात महावितरण अधिकाऱ्यांकडे वारंवार विनंती, तक्रारी करूनही विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी कोकलगाव १३२ केव्ही उपकेंद्राच्या टॉवरवर चढून आंदोलन केले.
गोरेगाववरून सुरजखेडा लिंक लाईन त्वरीत जोडावी, प्रस्तावित गावठाणसाठी रोहीत्र जोडून देण्यात यावे, पाणीपुरवठ्याची प्रस्तावित एक्सप्रेस लाईन सुरजखेडा येथील शेतकऱ्यांच्या शेतामधून नेण्यात येवू नये आदी मागण्या करण्यात आल्या. जोपर्यंत महावितरणचे अधीक्षक अभियंता आंदोलनस्थळी येत नाहीत तोपर्यंत टॉवरवरून खाली उतरणार नसल्याचा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता. आंदोलनात शेतकरी गजानन मगर, नारायण मगर, बबन मगर, संजय मगर, मारोती सुळे, अनिल मगर, धम्मप्रकाश मोरे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.