नर्सी नामदेव (जि. हिंगोली): सेनगाव तालुक्यातील तळणी येथे वरातीमध्ये नाचण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर तलवार व लोखंडी रॉडने हाणामारीची घटना घडली. याचा फटका नवरदेवास बसला असून लग्न न करताच नवरदेवास पळ काढावा लागला. त्यात नवरीही अल्पवयीन निघाल्याने लग्न मोडण्याची वेळ आली. ही घटना २८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील तळणी येथील मुलीचे लग्न सापटगाव येथील मुलाशी जुळले होते. गुरुवारी दुपारी तळणी येथे लग्नसोहळा आयोजित केला होता. त्यानुसार सकाळपासूनच लग्नाची धावपळ सुरू होती. तसा वधू पक्षाकडून लग्न वेळेवर लावण्याचा आग्रह होता. मात्र, वर पक्षाकडील मंडळी वरातीमध्ये नाचण्यात दंग झाली होती. याच वेळी शाब्दिक बाचाबाची झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि वाद विकोपाला गेला. काहींनी चक्क तलवारी व लोखंडी रॉडने मारहाण केली. दगडफेकही झाल्याने यात चार ते पाच जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नवरी निघाली अल्पवयीनघटनेची माहिती मिळताच नर्सी नामदेव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गिरी, पोलीस उपनिरीक्षक अशोक कांबळे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधून कर्मचाऱ्यांनाही पाचारण केले. हे पथक दाखल होताच वधू-वराच्या जन्म तारखेची तपासणी करण्यात आली. यात वधू अल्पवयीन असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या पथकाने विवाह रोखत नियोजित नवरीच्या आई-वडिलांचे समुपदेशन केले. इकडे नवरदेवानेही लग्न मंडपातून काढता पाय घेतला. लग्नाविनाच परत जाण्याची नामुष्की नवरदेवावर ओढवली.
दोघांविरुद्ध गुन्हा दाखलया प्रकरणी तालुक्यातील नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. लग्नमंडपात काही महिला बहिणीस जोरजोरात बोलत असल्याच्या कारणावरून दोघांना तलवारीने व लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी रवी नाथाराव वाकळे (रा. सापटगाव, ता. सेनगाव) यांच्या फिर्यादीवरून राजू खंदारे, अमोल खंदारे (दोघे रा. तळणी) यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक पोटे तपास करीत आहेत.