हिंगोली : दुचाकीचा कट मारल्यावरून व पोलीस ठाण्यात तक्रार का दिली, या कारणावरून हिंगोली शहरात रात्री दोन गटात हाणामारीची घटना घडली. याप्रकरणी परस्परविरुद्ध तक्रारीवरून २१ पेक्षा अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलीस पथकाने वेळीच धाव घेतल्याने पुढील वाद टळला.
हिंगोली शहरातील बुरूड गल्ली भागात मंगळवारी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. त्यामुळे या भागात काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती समजताच सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक एस. एस. आम्ले, सहायक पोलीस निरीक्षक ए. डी. काचमांडे, पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हारे, जमादार संजय मार्के आदींच्या पथकाने घटनास्थळाकडे धाव घेतली. पथकाने जमाव पांगविल्याने पुढील अनर्थ टळला.
दरम्यान, याप्रकरणी दोन्ही गटाकडून पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यात अनिकेत गणपतराव अलमुलवार (रा. बुरूड गल्ली, हरण चौक) यांच्या फिर्यादीवरून अरबाज खॉ असेफ खॉ पठाण, अफरोज असेफ खॉ पठाण, इम्तियाज खॉ आसेफ पठाण, आसेफ पठाण, शेख फेरोज शेख हनिफ व अन्य १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यात तू आमच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार का दिली, या कारणावरून आरोपींपैकी एकाने तलवारीने मारून जखमी केले.
दुसऱ्याने रॉडने मारहाण केली. इतरांनीही थापडा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच अफरोज खान आसिफ खान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनिकेत अलमुलवार, पवन मुदिराज, विवेक अलमुलवार, रोहन अलमुलवार व अन्य दोन ते तीन जणांविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. मोटारसायकलने कट मारल्याच्या कारणावरून लोखंडी पाईप, लाकडी दंडुके व थापडा-बुक्क्यांनी आरोपींनी मारहाण करून जखमी केल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक ए. डी. काचमांडे तपास करीत आहेत.