हिंगोली: खा. राहुल गांधी नेतृत्व करत असलेली भारत जोडो यात्रा सध्या हिंगोलीत आहे. यात्रेस कॉंग्रेस कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरातून अनेकजण यात्रेत सहभागी होत आहेत. दरम्यान, औरंगाबाद येथील एक २५ वर्षीय दिव्यांग यात्रेत सर्वांसोबत चालताना दिसत आहे. अब्दुल मुदत्सर अन्सारी असे या दिव्यांग युवकाचे नाव असून तो देगलूरपासून सहभागी झाला आहे. राहुल गांधी यांना गरिबांबद्दल जाणीव आहे. काँग्रेस एक विचारधारा असून त्याला प्रेरित होऊन मी राहुल गांधींसोबत चालणार असल्याचे या युवकाने सांगितले.
कन्याकुमारीपासून सुरु झालेली कॉंग्रेसचे खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेडमार्गे आता हिंगोलीत आली आहे. देगलूर येथून प्रत्येक दिवशी ठराविक अंतर कापत यात्रा आता हिंगोलीत दाखल झाली आहे. महाराष्ट्रात दाखल झाल्यापासूनच यात्रेस भरघोस प्रतिसाद लाभत आहे. देशभरातून अनेक संघटना, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य यात रोज दाखल होत आहेत. दरम्यान, कॉंग्रेसच्या विचारधारेपासून प्रेरित झालेल्या औरंगाबाद येथील दिव्यांग अब्दुल अन्सारी हा देखील देगलूर येथून यात्रेत सहभागी झाला आहे. दोन्ही पाय आणि हाताने तो अधू आहे. तरीही त्याच्या उत्साहात जराही कमतरता जाणवत नाही. इतर पदयात्रेकरुंसोबत अब्दुल पुढे जात आहे. कॉंग्रेसची विचारधारा आणि खा. राहुल गांधी यांच्यापासून प्रेरित होत यात्रेसोबत चालणाऱ्या दिव्यांग अब्दुलला पाहून इतरांनाही प्रेरणा मिळत असल्याचे पदयात्रींनी सांगितले.
बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या अब्दुलचे किराणा दुकान आहे. खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत अब्दुल नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून सहभागी झाल्यानंतर तो सर्वांसोबत चालत होता. दरम्यान, अब्दुलची जिद्दपाहून पहिल्याच दिवशी खा. राहुल गांधी यांनी त्यास बोलावून घेतले. विचारपूस करत त्याच्याबद्दल जाणून घेतले. या भेटीमुळे अब्दुलचा आनंदद्विगुणीत झाला आहे. तो बुलढाणापर्यंत यात्रेत चालणार आहे. यापूर्वी अब्दुल कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी देखील भेटला आहे. तर राहुल गांधी हे कोणालाही सहज भेटणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांना गरिबांबद्दल जाणीव आहे. ते मला भेटले, माझी विचारपुस केल्याने मी आनंदी आहे.