औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या अनेकांना हिंगोली जिल्ह्यात पाचशेच्या नोटांनी मालामाल केले. जिंतूर-औंढा या राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास पाचशेच्या नोटांचा पाऊसच पडला. पैशांचा मालक आणि लाभार्थी दोन्हीही शांत असल्याने पैसे कोणाचे, कशाचे आणि किती हे कळू शकले नाही.
औंढा नागनाथ येथून दोन किलोमीटर अंतरावरील नांदेड-औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गावर औंढा-जिंतूर फाट्यापासून ते गोळेगावनजीक एका पेट्रोल पंपाजवळ वळण रस्त्यावर सकाळी अज्ञात वाहनातून पाचशे रुपयांच्या नोटा पडल्या. वारा असल्याने त्या अक्षरश: एक किलोमीटर अंतरापर्यंत पसरल्या. रस्त्यावर पडलेल्या नोटा पाहून येणाऱ्या-जाणाºया वाहनचालकांनी चारचाकी, दुचाकी, ऑटो, सायकल थांबवून त्या गोळा केल्या. ज्यांना आधी संधी मिळाली ते मालामाल झाले. अर्ध्या तासात हा रस्ता साफ झाला. एका लाभार्थ्यानेच दिलेल्या माहितीनुसार, चालक, प्रवासी असे ४0 ते ५0 जण नोटांचे लाभार्थी ठरले. या नोटा कधी पडल्या, कुणाच्या आहेत, किती आहेत याची कुणालाही माहिती नाही.पोलीस म्हणतात, तक्रार आलेली नाही
या घटनेबाबत औंढा ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांना विचारले असता ते म्हणाले, नोटा हरवल्याबाबत किंवा गाडीमधून पडल्याबाबत आमच्याकडे तक्रार आलेली नाही. परंतु या रस्त्यावर जाणाºया अनेकांच्या हाती नोटा लागल्याची माहिती मिळाली आहे. तक्रार आली तर पुढील चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
नोटा खऱ्याच
हिंगोलीत काही दिवसांपूर्वी बनावट नोटांचे रॅकेट उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांनी नोटा खऱ्या की खोट्या, याची पडताळणी केली. मात्र या सर्व नोटा खºया असल्याचे हॉटेलमध्ये वेटर असलेल्या एका लाभार्थ्याने सांगितले.