हिंगोली : जिल्हाभरात ७ जूनरोजी सर्वदूर पावसाने हजेरी लावली. काही तास झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे.
जिल्ह्यात ७ जूनरोजी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. हिंगोली शहरासह कळमनुरी, कोंढूर, नांदापूर, शिरडशहापूर, नर्सी, जवळा बाजार यासह सेनगाव, वसमत, औंढा तालुक्यांतही जोराचा पाऊस सुरू झाला. यावेळी विजांचा कडकडाट होत असल्याने सकाळपासूनच शेतीच्या कामात व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांना आसरा शोधावा लागला. काहीवेळ जोरात झालेल्या पावसामुळे शेतीमध्ये चांगलाच ओलावा निर्माण झाला होता. पेरणीपूर्वी चांगला पाऊस झाल्याने मशागतीला वेग आला आहे. आणखी चांगला पाऊस झाल्यास शेतकरी पेरणीच्या तयारीत असून. आता चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, हिंगोली शहरातील नाल्याही ओसंडून वाहत होत्या. शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक, महावीर चौक परिसरात पाणीच पाणी झाले होते. तसेच रेल्वे पटरी परिसरात चांगलेच पाणी साचले होते. त्यामुळे पाण्यातून मार्ग शोधताना दुचाकीचालकांची तारांबळ उडाली. सर्वत्र चिखल झाल्याने दुचाकी वाहने घसरून पडल्याचेही दिसून येत होते. दरम्यान, शहरातील चौधरी नगरातही पूर्ण रस्ता पाण्याखाली गेला होता. जमिनीच्या समतल असलेल्या घरापर्यंतही पाणी पोहोचले होते. शिवाय ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले होते.
जिल्हाभरात सरासरी २.७० मिमी पाऊस
जिल्ह्यात ७ जूनरोजी सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासांत एकूण २.७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे; तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २२.९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या २.८८ टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.
तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे : यात कंसात आतापर्यंत पडलेला एकूण पाऊस.
हिंगोली २.६० (८.००) मि.मी., कळमनुरी ६.१० (४२.२०) मि.मी., सेनगाव ०.५० (१.५०) मि.मी., वसमत ३.२० (४०.३०) मि.मी., औंढा नागनाथ ०.२० (२१.७०) मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी २२.९० मि.मी. पावसाची नोंद झाल्याचे प्रशासनाने सांगितले.
फोटो