महिनाभराच्या खंडानंतर पावसाचे जिल्ह्यात आगमन झाले. अखेरची घटका मोजत असलेल्या पिकांना या पावसाने जीवदान मिळाले. सलग तीन दिवस अधून-मधून पाऊस होत असल्याने सूर्यदर्शनही झाले नाही. तसेच सखल भागात पाणी साचले असून कच्चे रस्ते चिखलमय झाले आहेत. हिंगोलीत शुक्रवारीही सकाळी पावसाची भूरभूर सुरू झाली होती. त्यानंतर दुपारी काही मिनिटे पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. तर नांदेड रोडवरील रेल्वे उड्डाणपूल परिसरातील रस्त्याला दलदलीचे स्वरूप आले होते. दुचाकी चालकांना वाहन चालविताना चांगलीच कसरत करावी लागली. दरम्यान, २० ऑगस्टच्या मागील २४ तासात जिल्ह्यात ९.६० मिलीमीटर पाऊस झाला. यात सर्वाधिक पाऊस कळमनुरी तालुक्यात झाली असून १९.१० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी पाऊस सेनगाव तालुक्यात ३.५० मि.मी. झाला. तसेच हिंगोली तालुक्यात ९ मि.मी., वसमत ८.२० मि.मी., औंढा ७.६० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात सरासरी ८४ टक्के पाऊस
तालुका सर्वसाधारण पाऊस एकूण झालेला पाऊस टक्केवारी
हिंगोली ८६७.९० ६७०.७० ७७.२८
कळमनुरी ७९५.४० ७०१.०० ८८.१३
वसमत ८२४.०० ६६३.४० ८०.५१
औंढा ७३६.१० ७५६.३० १०२.७४
सेनगाव ७२९.७० ५९१.६० ८१.०७
एकूण ७९५.३० ६७०.२० ८४.२७