वारंगा फाटा ( हिंगोली ) : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा, आखाडा बाळापूर परिसरात आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास सुमारे अर्धा तास पाऊस धो-धो बरसला. दुष्काळात पावसाने काही अंशी दिलासा दिला आहे.
वारंगा फाटा परिसरातील वारंगा, कुर्तडी, कुंभारवाडी, चुंचा, तोंडापूर व परिसरात मुसळधार पाऊस पडला. आॅगस्ट महिन्यांपासून पावसाने दडी मारली होती. परिसरातील विहिरी, ओढे-नाले, तलाव आटले होते. जलस्तरही कमालीचा खालावला होता. परिणामी, कोरडवाहू तसेच बागायती पिके माना टाकू लागले होते.
सिंचनासाठी पाणीच उपलब्ध नसल्याने हरभरा पेरणी करावी की नाही, या विवंचनेत शेतकरी होते. तर ऊस, हळद, केळी या पिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सदरील पिके सोडून दिली होती. जवळपास अडीच ते तीन महिन्यानंतर १९ नोव्हेंबर रोजी दुपारी तब्बल अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. परिणामी, सर्वत्र पाणीच पाणी झाले असून हरभरा पिकाला तूर्तास पाणी देण्याची गरज नसून हळद, केळी या बागायती पिकांसह गहू, तूर या पिकांना देखील या पाण्यामुळे दिलासा मिळाला आहे.
तर दुसरीकडे नुकतीच पेरणी केलेल्या गहू, हरभरा यांचे अंकुर जमिनीतून वर निघण्याच्या मार्गावर असल्याने कोमे दबून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. तर तुरीचा फुलोरा गळून जाण्याची भीती शेतकरी वगार्तून व्यक्त होत आहे. दरम्यान या पावसामुळे कही खुशी कही गम अशी परिस्थिती असली तरी पाऊस पडल्याने बळीराजा सुखावला आहे.