कळमनुरी : राजीव सातव यांच्या निधनाची वार्ता कळताच 16 मे रोजी सकाळपासूनच कार्यकर्ते त्यांच्या घरासमोर गर्दी करीत होते. रात्री 9 वाजेच्या दरम्यान त्यांचे शव कळमनुरी येथे आणण्यात आले. यावेळी त्यांच्या चाहते व कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. राजीव सातव यांच्या निवासस्थानी त्यांचे शव पाहताच अनेक कार्यकर्त्यांचे कंठ दाटून आले. यावेळी कार्यकर्त्यांनी राजीव सातव अमर रहे ,राजीव सातव जिंदाबाद, अशा घोषणा दिल्या अनेकांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
अनेक कार्यकर्ते त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आले होते. त्यांचे शव कळमनूरी शहरात दाखल होताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या शव वाहिनीवर पुष्पवृष्टी केली. 17 मे रोजी सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या निवासस्थानासमोरच्या मोकळ्या जागेत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
याठिकाणी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार मयूर खेंगले आदींची उपस्थिती होती. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता सातव यांचे घर ते मुख्य रस्त्यापर्यंत त्यांच्या चाहत्यांना-येण्यासाठी जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग ठेवण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड, राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार जीशान सिद्दिकी आदींची उपस्थिती होती. गर्दी होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक रणजित भोईटे,सपोनि श्रीनिवास रोयलावार, फौजदार ज्ञानोबा मुलगीर, सिद्दिकी आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान, काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच्या निधनाने सर्वच स्तरातून दु:खं व्यक्त होत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींपासून अनेक काँग्रेस नेते आणि राज्यातील नेत्यांनी राजीव सातव यांच्या जाण्याने शोक व्यक्त केला आहे. पुण्याच्या जहाँगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सावत यांचे रविवारी पहाटे निधन झाले.