हिंगोली : जिल्ह्याने पंचायत समिती सदस्यत्वापासून खासदारकीपर्यंत झेप घेतलेला व काँग्रेससारख्या राजकारणात महासागर मानल्या जाणाऱ्या पक्षात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करून छाप सोडणारा नेता आज गमावला आहे. सातव यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी बाळगलेल्या एकनिष्ठता व संघटन कौशल्यामुळे त्यांना पंजाब, गुजराथ, दीव व दमण या राज्याचे प्रभारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यात त्यांनी पक्षाच्या कामगिरीचा आलेखही उंचावला.
खा. राजीव सातव हे मूळचे कळमनुरी तालुक्यातील मसोड या गावचे. त्यांच्या मातोश्री रजनीताई सातव या कळमनुरीच्या आमदार, विधान परिषदेवर सदस्य तसेच मंत्री म्हणूनही राज्याच्या मंत्रिमंडळात राहिल्या. त्यांनीच राजकारणाचे बाळकडू राजीव यांना दिले. राजीव यांनी पंचायत समितीपासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. २००२ मध्ये ते पहिल्यांदा पंचायत समितीवर निवडून आले. पाच वर्षे पंचायत समितीत काम केल्यावर त्यांनी २००७ मध्ये जि.प.ची निवडणूक खरवड सर्कलमधून जिंकली. त्यावेळी ते कृषी सभापती झाले.
युवक काँग्रसचे प्रदेशाध्यक्षपदजि.प.चे कृषी सभापती असतानाच त्यांना युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले. थेट राहुल गांधी यांनीच त्यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांना राहुल गांधी यांनी तुम्हाला आवडणारा नेता कोण? असा प्रश्न केला असता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नाव त्यांनी सांगितले. पक्षनेता म्हणून नाव न घेता जे खरेच मनातून आले ते त्यांनी सांगितले. यातून सातव यांचे वेगळेपण गांधी यांनी हेरले. ते प्रदेशाध्यक्ष झाले.
२००९ मध्ये विधानसभेला गवसणीराजीव सातव यांनी जि.प.च्या कृषी सभापतीपदी विराजमान असतानाच विधानसभेची तयारी चालविली होती. सलग दोनदा विधानसभेवर गेलेल्या गजानन घुगे यांना मात देत त्यांनी २००९ मध्ये कळमनुरी विधानसभेवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. त्यावेळी राहुल गांधी स्वत: त्यांच्या प्रचाराला कळमनुरीत आले होते. आमदार झाल्यावर त्यांना पक्षाने युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. त्यामुळे राहुल गांधी यांच्याशी त्यांची अधिकच जवळीकता निर्माण झाली. त्यांना राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागले होते. राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळ असतानाही त्यांनी राज्याच्या राजकारणात आमदार असूनही पदाची अपेक्षा न ठेवता काम केले.
मोदी लाटेतही २०१४ ला खासदार२०१४ मध्ये देशात मोदी लाट आली. या लाटेतही महाराष्ट्रातून दोनच खासदार निवडून आले. त्यात अशोकराव चव्हाण हे तर माजी मुख्यमंत्री होते. मात्र दुसरा चेहरा होता, तो खा. राजीव सातव यांचा. त्यामुळे पक्षामध्ये त्यांचे वजन आणखीच वाढले. सामान्यांशी असलेली नाळ व कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्याशी अगदी आपुलकीने संवाद साधून ते मन जिंकायचे. अगदी कौटुंबिक सदस्यासारखा त्यांचा हा सहवास असायचा.
चारवेळा संसदरत्न पुरस्कारराजीव सातव यांनी लोकसभेत ८१ टक्के उपस्थिती अन् १०७५ प्रश्न विचारून आपल्या अभ्यासूवृत्तीची छाप त्यांनी पाडली होती. पाच वर्षांच्या काळात त्यांना चार वेळेस संसदरत्न पुरस्कार मिळाला होता. याशिवाय राज्यसभेत त्यांनी अर्थसंकल्पावर विश्लेषणात्मक भाषणदेखील केले होते. शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न, शैक्षणिक विषयावरील प्रश्न ते पोटतिडकीने मांडायचे. याशिवाय त्यांना लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर २०१६ हा पुरस्कारही मिळाला.
सातव यांनी आतापर्यंत भूषविलेली पदेमसोड पंचायत समिती गणाचे सदस्य, हिंगोली जिल्हा परिषद सदस्य, कळमनुरी विधानसभा आमदार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, हिंगोली लोकसभेचे खासदार, राज्यसभा सदस्य, प्रभारी पंजाब, गुजरात, दीव व दमण काँग्रेस.
प्रभारी म्हणूनही उमटविला ठसासातव यांनी एनडीएमध्ये मुलींना प्रवेश द्यावा, ही अग्रही मागणी लोकसभेत मांडली होती. त्यांच्या मागणीला यशही आले होते. शिवाय, गुजरात, पंजाब या राज्यांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेस उमेदवारांचा प्रचार केला. यात, गुजरात विधानसभा निवडणुकीत सौराष्ट्राची जबाबदारी अंगावर घेऊन सर्वात जास्त २८ उमेदवार विजयी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. पंजाबमध्येही सत्तेच्या सोपानापर्यंत पक्षाला घेऊन जाण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
जिल्ह्याच्या विकासावरही होते लक्षदेश पातळीवर राजकारण करताना त्यांचे जिल्ह्याच्या विकासाकडेही लक्ष होते. आदिवासी विकास प्रकल्प, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी, सशस्त्र सीमा बल कळमनुरी हे त्यांच्या प्रयत्नांचे फळ आहे. शिवाय देशातील एकमेव मोठा प्रकल्प असलेला औंढा तालुक्यातील लिगोचा प्रकल्प होण्यासाठी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याकडे पाठपुरावा त्यांनीच केला होता. त्याला हिरवी झेंडी मिळाली होती. त्यावेळी ते खासदार नव्हते. ते खासदार झाल्यानंतर देशात सत्तापालट झाला असताना या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. इतरही शेकडो विकास कामांमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.
शैक्षणिक क्षेत्रात कामगिरीकळमनुरीसारख्या मागसलेल्या तालुक्यात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दरवाजे खुले करण्यासाठी त्यांनी प्रियदर्शनी सेवा संस्थेच्या माध्यमातून शंकरराव सातव महाविद्यालय सुरू केले. या शिवाय डीएड, बीएड अभ्यासक्रम देखील सुरू केले. मागील काही दिवसांत हिंगोलीत वैद्यकीय महाविद्यालय स्थापन व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न करत होते. त्यानुसार राज्य शासनाने हालचाली सुरू केल्या.
कौटुंबिक पार्श्वभूमीराजीव सातव यांच्या आई रजनी सातव माजी मंत्री राहिल्या आहेत. आईशिवाय कुटुंबात पत्नी डॉ. प्रज्ञा सातव, मुलगा पुष्कराज सातव, मुलगी युवराज्ञी सातव आहेत. राजकारणामुळे त्यांना आपल्या कुटुंबाला जास्त वेळ देता आला नाही; पण कुटुंबानेही याबाबत कधीच खंत बोलून दाखवली नाही. मागील काही दिवसांपासून प्रियदर्शनी सेवा संस्थेचा कारभार रजनीताई व डॉ. प्रज्ञा सातव पाहत आहेत. याशिवाय स्थानिक कार्यकर्त्यांना त्यांचा मोठा आधार आहे.