१५ मे रोजी पुन्हा खा. राजीव सातव यांची प्रकृती नाजूक असल्याच्या वार्तेनंतर जिल्हा चिंतेत पडला होता. अनेक जण कालपासूनच त्यांच्या प्रकृतीची पुन्हा विचारणा करताना दिसत होते. आज सकाळी पुण्याच्या जहांगिर रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवल्याचे वृत्त धडकले. त्यामुळे जिल्हावासीय पुन्हा शोकसागरात बुडाले. आपल्या राजकीय जीवनात अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून खा. राजीव सातव परिचित होते. त्यामुळे त्यांच्या निधनाचे वृत्त विरोधकांनाही तेवढाच चटका लावून गेले.
राजकीय जीवनात पंचायत समिती सदस्य ते खासदार व काँग्रेसचा राष्ट्रीय पातळीवरील चेहरा असा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. कळमनुरी विधानसभेत आमदार, हिंगोलीचे खासदार व आता राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा प्रत्येक वेळी उमटविला. मतदारसंघातच नव्हे, तर देशातील विविध भागात त्यांनी संघटनेचे जाळे निर्माण करून आपला चाहता वर्ग निर्माण केला होता. पक्षाशी एकनिष्ठता व संघटन कार्यात झोकून देण्याची वृत्ती यामुळे त्यांना सध्या राज्यसभेवर संधी दिली होती. मात्र त्यांच्या या अकाली जाण्याने प्रत्येकालाच गहिवरून येत आहे.