- शेख इलियास -कळमनुरी : माजी मंत्री रजनीताई सातव यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी १८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता नांदेड येथे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या जाण्याने विकासाचा महामेरू हरवला आहे.
रजनीताई सातव या वकिली व्यवसायातून सामाजिककार्याकडे वळल्या. त्यांचा जन्म पुणे येथे १३ जुलै १९४९ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण सेवासदन पुणे येथे झाले. १९८० मध्ये त्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या. रजनीताई सातव यांच्या निधनाने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
हिंगोली जिल्हा होण्यापूर्वी कळमनुरी मतदारसंघ हा माकपाचा बालेकिल्ला होता. १९८२ मध्ये मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात त्यांना आरोग्य उपमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. तेव्हापासून रजनीताई सातव यांनी कळमनुरी मतदारसंघात विकासाची कामे सुरू केली. या काळात १९८३ मध्ये त्यांचे पती डॉ. शंकरराव सातव यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्या दु:खातून नंतर त्या सावरल्या. फेब्रुवारी १९८३ ते १९८५ या वर्षात वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्यावर महसूल राज्यमंत्रिपदाची जबाबदारी टाकण्यात आली. या वर्षात त्या दुसऱ्यांदा कळमनुरी विधानसभेवर निवडून आल्या.१९८५ मध्ये मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मंत्रिमंडळात त्यांना सार्वजनिक आरोग्यमंत्री म्हणून जबाबदारी टाकण्यात आली. याचवर्षी त्यांच्यावर कापूस पणन महासंघावर संचालिका म्हणून जबाबदारी टाकण्यात आली होती. मार्च १९८६ मध्ये त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. १९८७ मध्ये त्यांना महिला आर्थिक व विकास महामंडळाच्या अध्यक्षा म्हणून जबाबदारी टाकण्यात आली. १९८८ मध्ये त्यांना मुख्यमंत्री शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक आरोग्यमंत्री म्हणून राज्यमंत्रिपद देण्यात आले.
महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम केले...राज्यातील परिचारिका सेवा विषय समितीच्या त्या अध्यक्ष बनल्या. त्यानंतर दोनवेळा विधान परिषदेच्या आमदारही राहिल्या. काँग्रेस पक्षाने त्यांना महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्य करण्याची जबाबदारी सोपविली. या कार्यकाळात त्यांनी अनेक महिलांना न्याय मिळवून दिला. काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष म्हणूनही पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी टाकली होती. काँग्रेस पक्षाची पाळेमुळे त्यांनी प्रत्येक खेडोपाड्यापर्यंत रुजविली होती.
पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळविली...कळमनुरी शहरासाठी पहिली पाणीपुरवठा योजना त्यांनी मंजूर करून आणली होती. आदिवासी समाजासाठी विविध योजना त्यांनी मंजूर करून आणल्या होत्या. विकासाची कामे करून त्यांनी कळमनुरी तालुक्याचा चेहरामोहरा बदलला होता. पुढच्या पिढीसाठी त्यांनी अनेक विकासाची कामे करून ठेवली. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात काँग्रेसचा बोलबाला होता. त्यांच्याकडे काम घेऊन आलेल्या प्रत्येकाचे काम झाले पाहिजे, अशी जिद्द त्यांची इच्छा होती. प्रत्येक जण आपले काम घेऊन त्यांच्याकडे जात होते. जात-पात व पक्षाचा विचार न करता त्यानी सर्वांची कामे केली.
गरिबांसाठी शिक्षणाची दारे खुली केली...कळमनुरी तालुका हा मागासलेला व डोंगराळ भागात असल्याने त्यांनी प्रियदर्शिनी सेवा संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कळमनुरी शहरात विद्यालय, महाविद्यालय व तालुक्यात काही ठिकाणी शाळा सुरू करून सर्वांना शिक्षणाची दारे खुली केली. राज्यमंत्रिपदी असताना त्यांनी कळमनुरी येथील एसटी आगार शासनाकडून मंजूर करून आणले होते. विकासाची कामे करण्यात त्यांचा हातखंडा होता. दोन वर्षांपूर्वी त्यांचे चिरंजीव स्व. खा. राजीव सातव यांचे निधन झाल्यामुळे त्या चांगल्याच खचल्या होत्या.