हिंगोली : राखी पौर्णिमा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, बसस्थानकात प्रवाशांची संख्या वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
कोरोनाकाळात प्रवासी संख्या ३० टक्के होती. आजमितीस राखी पौर्णिमेमुळे प्रवासी संख्येत वाढ झाली असून ६० टक्के प्रवासी प्रवास करताना दिसून येत आहेत. कोरोना महामारी कमी झाली असली तरीही कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे ग्रामीण भागातील बसेस अजून सुरू केलेल्या नाहीत. शासनाचा आदेश आल्यास ग्रामीण भागातील बसेसही सुरू करण्यात येतील, असे एस. टी. महामंडळाने सांगितले. सद्य:स्थितीत लांब पल्ल्याच्या बसेस सुरू केल्या असून, प्रवासी संख्या चांगली असल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रवाशांची गर्दी...
कोरोना महामारीमुळे प्रवासी संख्या घटली होती; परंतु, सध्या प्रवासी संख्या वाढली आहे.
सद्य:स्थितीत परभणी, नांदेड, अकोला, रिसोड, यवतमाळ, औरंगाबाद, पुणे, आदी बसेसना प्रवासी संख्या वाढली आहे.
मागणीनुसार बसेस वाढवू
सद्य:स्थितीत ग्रामीण भाग वगळता लांब पल्ल्यांच्या बसेस नियमितपणे सुरू आहेत. प्रवासी संख्याही ६० टक्क्यांच्या आसपास आहे. कोरोनाचे रुग्ण अजूनही आढळून येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भाग सुरू नाही. प्रवाशांची मागणी आल्यास लांब पल्ल्याच्या बसेस सुरू केल्या जातील.
- संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख