लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील इडोळी येथे अवैधरीत्या दारूविक्री सुरू आहे. त्यामुळे गावातील दारूबंदीसाठी महिलांनी १८ सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून याबाबतचे निवेदन पोलीस प्रशसनाकडे सादर केले.गावात सर्रासपणे देशीदारूची विक्री होत आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. तरुणाई व्यसनाधीन बनत आहे. पती-पत्नीमध्ये रोजचे भांडण हा नित्याचाच प्रकार झाला आहे. त्यामुळे गावात अशांतता पसरली आहे. दारूच्या व्यसनामुळे गरीब कुटुंबे रस्त्यावर येत आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्याही अभ्यासावर परिणाम होत आहे. गावात दारूविक्री करू नका असे म्हणले असता विक्रेते उलट-सुलट बोलत असल्याचेही महिला यावेळी सांगत होत्या. त्यामुळे इडोळी परिसरात अवैधरीत्या सुरू असलेली दारूविक्री बंद करण्याची मागणी महिलांनी पोलीस प्रशासनाकडे केली. यावेळी मोठ्या संख्येने महिला पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात जमल्या होत्या. आता पोलीस प्रशासन महिलांच्या मागणीवर काय निर्णय घेईल, ठोस कारवाई होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी गावातील दारूविक्री बंद करून तत्काळ कारवाई कराव, अशी प्रतिक्रिया महिला व बालकल्याण सभापती रेणुका भानुदास जाधव तसेच इडोळी येथील सरस्वती जाधव, लक्ष्मी जाधव इ. महिलांनी दिल्या. मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या.
दारूबंदीसाठी रणरागिणी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 1:07 AM