वसमत (जि. हिंगोली) : लाकडांच्या वाहतुकीसाठी प्रतिट्रॅक्टर २ हजार रुपये, याप्रमाणे ४ ट्रॅक्टरचे ८ हजारांची लाच घेणाऱ्या वनरक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी वनरक्षकासह महिला वनपालाविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वसमत तालुक्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वसुलीच्या अनेक कथा ऐकायला मिळतात. वसुलीसाठी अनेक खासगी दलालही कार्यरत आहेत. वनरक्षक मुख्यालयी न राहता दलालामार्फत कामे करत असल्याच्या तक्रारी आहेत. लाकडांच्या वाहतुकीसाठी ८ हजारांच्या लाचेची मागणी वनरक्षकाने केली हाेती.
या संदर्भात हिंगोली लाचलुचपत प्रतिबंधक पथकाची सापळा रचला. या सापळ्यात ८ हजारांची लाच घेताना वसमत वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनरक्षक संदीप तात्याराव पंडित (३२) हे लाच घेताना रंगेहाथ पकडले आहेत. या प्रकरणात वनपाल महिला वनपालचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यावरून वनपाल प्रियंका पांडुरंग देवतकर (३१) यांच्या विरोधातही तक्रार नोंदवण्यात आली आहे.
या पथकात पोलीस निरीक्षक नीलेश सुरडकर, विजय उपरे, रुद्रा कबाडे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, तान्हाजी मुंढे, हिमतराव सरनाईक यांच्यासह हिंगोली लाचलुचपत प्रतिबंधक पथकातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. दोन वर्षांपूर्वीही वसमत येथील वनपालाला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतले होते. विशेष म्हणजे आता महिला वनपाल आल्यानंतरही लाच वसुलीची पद्धत सुरू झाल्याचे पहावयास मिळत आहे.