हिंगोली : वेळेची बचत करण्यासाठी अनेक वाहनचालक राँगसाइडने वाहने नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. शहरातील विविध चौकांत सोमवारी अनेक वाहनचालक विरुद्ध बाजूने वाहने नेत असल्याचे पाहावयास मिळाले.
शहरासह जिल्हाभरात वाहने वाढली आहेत. परिणामी, रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी रस्त्यांवर दुभाजक टाकण्यात आले आहेत. अनेक वाहनचालक दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी शॉर्टकट वापरत आहेत. वेळेची बचत करण्याच्या नादात शॉर्टकट वाहने चालविणाऱ्यांमुळे समोरील वाहनचालकांनाही अपघाताला सामोरे जावे लागते. त्यामुळे शॉर्टकट जीवघेणा ठरू शकतो. अशा वाहनचालकांना आवर घालणे गरजेचे बनले आहे.
ही आहे राँगसाइड
इंदिरा गांधी चौक
बसस्थानक भागातून रामलीला मैदानाकडे जाणारी वाहने शहरातील इंदिरा गांधी चौक भागातून नेताना चौकाला वळसा घालून जाण्याऐवजी मधूनच वाहने नेण्याचा प्रयत्न करतात. सोमवारी अनेक वाहने येथून चुकीच्या दिशेने जाताना दिसत होती.
महात्मा गांधी चौक
इंदिरा गांधी चौकाकडून येणाऱ्या रस्त्याने समोर महात्मा गांधी चौक भागातून जवाहर रोडने जाणारी वाहने महात्मा गांधी चौकाला वळसा घालून जाण्याऐवजी शॉर्टकटने नेली जात आहेत. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
रेल्वे उड्डाणपूल रिसाला बाजार
शहरातील रिसाला बाजार भागात असलेल्या रेल्वे उड्डाण पुलावरून शासकीय दवाखान्याकडे जाणारी वाहने थेट वळण घेत आहेत. त्यामुळे पाठीमागून येणारे वाहनचालक गोंधळून जात आहेत. त्यात येथे उतार असल्याने अपघाताला आमंत्रणच मिळत आहे.
धोकादायक वाहन चालविणे : सहा महिन्यांत सव्वासात लाखांचा दंड
कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले होते. या काळात रस्त्यावर फारसी वाहतूक नव्हती. त्यामुळे राँगसाइडने वाहने चालविणारे चालक क्वचित आढळून येत होते. मात्र, चालू वर्षातील जूनपर्यंत ७३९ वाहनचालक धोकादायक पद्धतीने वाहन चालविताना पोलिसांना आढळले. या वाहनचालकांना पोलिसांनी ७ लाख ३९ हजारांचा दंड लावला आहे.
जिल्ह्यात रस्त्यांची कामे सुरू आहेत. पावसाळा असल्याने वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वेळेच्या बचतीसाठी राँगसाइडने वाहन चालविणे चुकीचे आहे. राँगसाइडने वाहन चालविणे जिवावर बेतू शकते. वाहने काळजीपूर्वक चालवावीत.
- यशवंत काळे, प्रभारी पोलीस अधीक्षक, हिंगोली
फोटो :
हिंगोली शहरात दीड वर्षातील अपघात -२०
मृत्यू - ०३
जखमी - १९
नियम पाळणे आवश्यक
अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. राँगसाइडने वाहने नेण्याच्या नादात वाहतूक विस्कळीत होऊन अपघात होण्याची शक्यता असते.