हिंगोली : गोरगरीबांना कमी दरात शिधा पत्रिकेवर दिला जाणारा स्वस्त धान्य दुकानातील १० टन तांदूळ काळ्या बाजारात नेला जात असताना पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पकडला. ही कारवाई तालुक्यातील नर्सी फाटा येथे २४ जुलैरोजी रात्री १० वाजता करण्यात आली. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
जिल्ह्यातील अवैध धंदे चालकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथकही स्थापन केले आहे. गोरगरीबांना कमी दरात शिधा पत्रिकेवर दिला जाणारा स्वस्त धान्य दुकानातील १० टन तांदूळ काळ्या बाजारात नेला जात असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. त्यावरून तालुक्यातील नर्सी फाटा येथे २४ जुलै रोजी रात्री १० वाजता पथकाने सापळा लावला.
यावेळी एमएच ०४ डीएस ८३८९ क्रमांकाचा ट्रकला थांबवून आतमध्ये पाहणी केली असता आतमध्ये तांदूळ आढळून आला. तसेच या बाबत विचारणा केली असता चालकास समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे जवळपास २ लाख ५० हजार रूपये किमतीच्या १० टन तांदळासह ६ लाखाचा ट्रक असा एकूण ८ लाख ५० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे यांच्या फिर्यादीवरून अरबाज पठाण (रा. पलटन) व अन्य एकावर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
स्वस्त धान्य दुकानातील अंदाजे १० टन तांदूळ काळ्या बाजारात चढ्या भावात विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे, पोलिस अंमलदार सुमित टाले, मोहसिन शेख, विनोद दळवी, तुकाराम जाधव आदीच्या पथकाने केली.