सेनगाव (जि. हिंगोली) : तालुक्यातील जिंतूर-सेनगाव राज्य रस्त्यावरील अर्धवट पुलाच्या कामाने पुन्हा दोन जणांचा बळी घेतला आहे. शनिवारी मध्यरात्रीला मोटारसायकल थेट अर्धवट पुलाच्या कामात घुसल्याने दोघे जण जागीच ठार झाले आहेत. यापूर्वी याच अर्धवट पूल कामामुळे अपघात होऊन ४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आतापर्यंत ६ जणांचा बळी घेणारा हाच ताे पूल आहे.
सेनगाव-जिंतूर राज्य रस्त्यावरील संथगतीने हाेत असलेली पुलाची कामे अपघाताचे कारण बनत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व काम करणारी एजन्सी याबाबत बेफिकीर असून, वाहनधारकांचे बळी घेणाऱ्या अर्धवट पूल बांधकामाने पुन्हा दोन तरुणांचा बळी घेतल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीला घडली आहे. या रस्त्यावर योग्य ठिकाणी दिशादर्शक फलक लावलेले नसल्याने रात्रीच्या दरम्यान वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. परिणामी अपघात होत आहेत. सेनगाव शहराजवळील असलेल्या या पुलाच्या कामाने यापूर्वी १५ जूनला बुलडाणा जिल्ह्यातील चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या गंभीर घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही दखल घेतली नाही.
हेही वाचा - कोल्ड बल्डेड मर्डर ! प्रियकर आणि मुलाच्या मदतीने विहिरीत बुडवून संपविला पती
अर्धवट पुलाच्या कामाने शनिवारी मध्यरात्रीला हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता येथील तेजस चंद्रभान पाईकराव (वय १९), सचिन दत्तराव पवार (वय २७), हे दोघे जिंतूरच्या दिशेने जात हाेते. या अर्धवट कामाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने त्याचा अंदाज आला नाही. यामुळे दुचाकी पुलाच्या कामाला धडकून दोघेही गंभीर जखमी होत जागीच ठार झाले. हा प्रकार सकाळी अन्य वाहनधारकांच्या निदर्शनास आला. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांनी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी चंद्रभान पाईकराव यांच्या फिर्यादीवरून नाेंद केली आहे. एकदरीत जिंतूर रस्त्यावरील अर्धवट पुलांची कामे वाहनधारकांसाठी जीवेघेणी ठरत आहेत. रस्त्याचे काम करणाऱ्या एजन्सीने दिशादर्शकांसह अन्य सुरक्षेची खबरदारी घेणे गरजेची आहे.
हेही वाचा - मराठवाड्यातील ४ धरणे, एक बंधारा तुडुंब; जायकवाडी धरण ५६ टक्क्यांवर