लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात हागणदारीमुक्तीची चळवळ गतिमान करून यातील उद्दिष्ट तर पूर्ण करण्यात आले आहे. मात्र आता शौचालय अनुदानासाठी बोंब वाढत चालली आहे. नुकतेच ११ कोटींच्या मंजुरीचे आदेश मिळाले असून आणखी ५१ कोटींची गरज आहे. ४२ हजार ७६१ शौचालयांचे प्रोत्साहन अनुदान वाटप राहिले आहे.बेसलाईन सर्व्हेनुसार पात्र लाभार्थ्यांना १२ हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जात होते. हिंगोली जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यामध्ये शौचालय अनुदानासाठी पात्र लाभार्थी ४१ हजार ४६४ एवढे होते. तर ५0 हजार २00 शौचालय बांधकामांचे उद्दिष्ट एपीएल व बीपीएलमधून गाठण्यात आले होते. तर ४२ हजार ७६१ शौचालयांचे प्रोत्साहन अनुदान वितरित करणे बाकी आहे. यामध्ये औंढा नागनाथ ५६२६, वसमत-७८८४, हिंगोली-७८८५, कळमनुरी-१२१६४ तर सेनगावातील ९२४२ लाभार्थ्यांचा समावेश आहे. ज्या लाभार्थ्यांनी पहिल्या टप्प्यात शौचालयाचे बांधकाम केले अशांना मात्र प्रोत्साहन अनुदान मिळालेले आहे. मात्र ज्या तालुक्यांनी शेवटच्या टप्प्यात उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न केला, अशांची अडचण झाली. कळमनुरीला तर १४.५९ कोटी एकट्यालाच लागणार आहेत. २0१७-१८ या आर्थिक वर्षात औंढा-७.७८, वसमत-९.४८, सेनगाव-६.८१, कळमनुरी-७.४७ तर हिंगोलीत ७.७६ कोटी प्रत्यक्ष लाभ वाटपासह खर्ची पडले आहेत.शासनाच्या स्वच्छता अभियानात पुढील टप्पा म्हणून आता घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे काम हाती घेतले जाण्याची शक्यता आहे. स्वच्छ भारत अभियानाचा हा दुसरा टप्पा असेल. यापूर्वी जिल्ह्यातील २५ गावांत अशी कामे झाली आहेत. अद्याप त्याच्या सूचना नसल्या तरीही येत्या काळात त्या येतील, अशी चिन्हे आहेत.
शौचालय अनुदानाचे ५१ पैकी ११ कोटीच प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:38 AM