लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात आलेल्या बीआरजीएफ योजनेतील ७८ लाखांच्या अपहाराच्या रक्कमेपैकी १९ लाखांची कामेच ग्रा.पं.नी पूर्ण केली असून १७ लाखांची वसुली झाली आहे. अजूनही ४१ लाखांच्या वसुलीचा प्रश्न कायम आहे.बीआरजीएफ योजनेत पाच वर्षांच्या काळात जवळपास ९0.९0 कोटी रुपयांची कामे झाली. ही योजना २0१५-१६ या आर्थिक वर्षात शासनाने बंद केली. मात्र तत्पूर्वीच्या अर्धवट कामांमुळे ती बराच काळ चर्चेत राहिली. त्यानंतर या योजनेतील अर्धवट कामांचा निपटाराच होत नसल्याने व निधीही ग्रामपंचायतींनी परत न केल्याने अनेक ठिकाणी अपहाराचे गुन्हे दाखल झाले. अनेक ग्रामसेवकांची या प्रकरणात विभागीय चौकशीही लागली होती.यात ३९ ग्रामपंचायतींची ६0 कामे झाली नसल्याचा प्रकार समोर आला होता. तर यात ७८.३२ लाखांचा अपहार झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर या ग्रामपंचायतींकडून अपहाराच्या रक्कमेच्या वसुलीसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने प्रयत्न सुरू केले होते. परंतु त्याला सरपंच व ग्रामसेवक बदललेल्या ठिकाणी कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. काही ठिकाणी त्याच पदाधिकाºयांकडे पुन्हा सत्ता आल्याने अशांनी कामे पूर्ण करून घेण्यात धन्यता मानली.काहींनी तर काम कमी अन् एमबी मात्र पूर्ण रक्कमेची बनवत हे प्रकरण निस्तारण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे १९ लाखांची कामे झाल्याने एवढी रक्कम वसुलीतून बाहेर आली. तर १७ लाखांची रक्कम प्रत्यक्षात वसूल झाली.२0१५-१६ या आर्थिक वर्षात बीआरजीएफ ही योजना केंद्र शासनाने गुंडाळल्यानंतरही ही योजना अजूनही चर्चेत आहे. महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू होती. मागास भागातील निकडीच्या बाबींना किंवा अर्धवट पडलेल्या कामांना या योजनेत पूर्ण करण्याची संधी होती. मात्र यात घेतलेली कामेच अर्धवट ठेवून ग्रामपंचायतींनी नवीच समस्या समोर आणली. आता ही बाब निस्तारण्यातच जिल्हा ग्रामीण यंत्रणा अजूनही हैराण आहे.
बीआरजीएफची ४१ लाखांची वसुली होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 12:36 AM