हिंगोली : शहरातील एनटीसी भागातील नाईकनगर येथील महिंद्रा रूरल हाऊसिंग फायनान्स लि. शाखेतील वसुली अधिकार्याने एकूण ४६ लोकांनी दिलेले पैसे भरलेच नाहीत. ग्राहक व कंपनीची एकूण ७ लाख ६४ हजार ७६३ रूपयांनी गंडा घालून फसवणूक केल्याप्रकरणी वसुली अधिकार्याविरूद्ध शुक्रवारी (दि. २३) रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला.
हिंगोली शहरातील नाईकनगर येथील महिंद्रा रूरल हाऊसिंग फायनान्स लि. शाखेत वसुली अधिकारी म्हणून बालाजी लक्ष्मणराव बांगर कामाला होते. माहे जुलै २०१६ ते २९ जुलै २०१७ या कालावधीत बांगर याने हा गैरप्रकार केल्याचा आरोप कंपनीतर्फे करण्यात आला आहे. फायनान्स दिलेल्या लोकांकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी बांगर यांच्याकडे होती. परंतु पैसे वसूल करूनही त्यांनी सदर रोकड कंपनीकडे न भरता स्वत:कडेच ठेवून घेतली. हा प्रकार कंपनीच्या लक्षात आल्यानंतर एक -एक प्रकरण उघडकीस आले. त्यांनतर शाखेचे रामेश्वर शामराव लुटे यांनी कंपनीची फसवणूक झाल्याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून बालाजी लक्ष्मण बांगरविरूद्ध कलम ४२०, ४०८, ४०६ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती हिंगोली शहर ठाण्याचे पोनि अशोक मैराळ यांनी दिली.