पालम : तालुक्यातील निसर्गरम्य स्थळ असलेल्या जांभूळबेटाच्या नशिबी नेहमीच उपेक्षा येत आहे. विकास कामे तर सोडाच पण शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे शासन दरवर्षी रेकॉर्डवर अजूनही जांभूळबेटाची नोंद झालेली नाही. आता तरी जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी पुढाकार घेऊन बेटाचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे.
गोदावरी नदीपात्रात मधोमध जांभूळबेटाचा परिसर आहे. पालम तालुक्याच्या हद्दीत हा भाग येत असल्याने महसूल यंत्रणेच्या दप्तरात बेटाची नोंद असणे महत्त्वाचे आहे. परंतु, पालम येथील तहसील कार्यालयामध्ये बेटाची नोंद असलेला पुरावाच नाही. गंगाखेड तहसील जुने असल्याने किमान या ठिकाणी तरी जांभूळबेटाची नोंद असलेला दस्ताऐवज मिळेल, ही आशा आहे. परंतु, या कार्यालयातही नोंद नाही. सामाजिक वनीकरण विभागाने वर्षभरापूर्वी वृक्षलागवडीच्या कामासाठी कागदपत्रे तयार केली होती. यावेळीच जांभूळबेटाची नोंद नसल्याचा प्रकार पुढे आला आहे. यामुळे वृक्ष लागवडीचे काम पुढे सरकले नाही.
जांभूळबेटाची शासन दरबारी नोंद नसल्याची बाब वारंवार निसर्गप्रेमी नागरिकांकडून होत आहे. अधिकार्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला आहे. परंतु, अद्यापही शासन दरबारी नोंद झालीच नाही. /(प्रतिनिधी)
रस्ता दुरुस्त करा
> पालम ते जांभूळबेट या पाच किमी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची नेहमीच डागडुजी केली जाते. परंतु, रस्ता मात्र 'जैसे थे' आहे.
> शासनाने रस्ता कामासाठी निधी मंजूर केला आहे. या निधीतून रस्त्याची डागडुजी करण्याऐवजी रस्ता डांबरीकरण करावा, अशी मागणी पर्यटकांतून होत आहे.
> पर्यटनाचा दर्जा न मिळाल्यामुळे जांभूळबेटाचा विकास खुंटला आहे. याचे गांभीर्य प्रशासन व लोकप्रतिनिधींना नाही.