हिंगोली जिल्ह्यात २०२० मार्चअखेर ४९ हजार २४३ बेरोजगारांची नोंद झाली होती. त्यानंतर कोरोना काळात मात्र इतर सर्व विभागांप्रमाणेच या कार्यालयातही नवीन नोंदींची संख्या घटली होती. त्यातच कोरोनामुळे फिरण्यावर बंदी होती. शिवाय अनेक उद्योगही बंद पडले होते. त्यामुळे नवीन रोजगाराची संधी तर सोडा आहे ते रोजगार गेल्याने अनेकजण हैराण होते. त्यामुळे या काळात रोजगारही मिळणे दुरापास्त झाले होते. ऑगस्टमध्ये पहिल्यांदा ३३ जणांना रोजगार मिळाला होता. त्यानंतर सप्टेंबरमध्ये तब्बल १२८३ जणांना रोजगाराची संधी मिळाली. या काळात रोजगार मेळावेही प्रत्यक्षात घेणे शक्य नव्हते. त्यामुळे ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन करून बेरोजगारांना संधी उपलब्ध करून दिली.
रोजगार मेळाव्यांना जेमतेम प्रतिसाद
जिल्ह्यात यंदा रोजगार मेळाव्यांचे प्रत्यक्ष आयोजन करणे शक्य झाले नाही. त्यामुळे ऑनलाईन मेळाव्यांवर भर देण्यात आला होता. या मेळाव्यांचेही आयोजन सप्टेंबर महिन्यातच सर्वाधिक होते. त्याचा परिणामही चांगला झाला. या मेळाव्यात जिल्ह्यातील तब्बल १२८३ जणांना रोजगाराची संधी मिळाली. त्यानंतर दिवाळीमुळे पुन्हा हे मेळावे ठप्प झाले होते. आता राज्यस्तरीय मेळावेच होत असून यातही हिंगोली जिल्ह्यासाठी ५३७ जागा उपलब्ध झाल्या आहेत. हा मेळावाही ऑनलाईन आहे. यात ११२२ अर्ज आले आहेत. त्यातील किती जणांना संधी मिळेल, हे आगामी काळात कळणार असून अजून ही प्रक्रिया अंतिम झाली नाही.
रोजगाराच्या संधी
जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना राज्यस्तरीय मेळाव्याच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी आहेत. यापूर्वीही काही ऑनलाईन मेळावे झाले. त्यात हजारावर तरुणांना रोजगाराची संधी मिळाली आहे. याशिवाय काही शासकीय जागांवरही मुलांना संधी मिळाली आहे. बेरोजगार युवकांनी नाेंदणी केल्यास त्यांना याबाबत माहिती देऊन या संधींबाबत अवगत केले जाते. त्यात पुढे त्यांच्या काैशल्यानुरुप रोजगार मिळतो
- पी.एस.खंदारे, रोजगार व स्वयंरोजगार अधिकारी, हिंगोली
यापूर्वीच्याच हजारो जणांनी नोंदणी केली असताना त्यांना कधी रोजगारासाठी स्वयंरोजगार कार्यालयाकडून साधा काॅल येत नाही. त्यामुळे मी बेरोजगार असलो तरीही नोंदणीच्या भानगडीत पडलो नाही. स्वत:च रोजगार शोधतो.
- अमोल पाईकराव, बेरोजगार, साळवा
बेरोजगारांना रोजगाराच्या संधींसाठी अनेकदा मेळावे होतात. मात्र बऱ्याचदा त्यात तांत्रिक शिक्षणावर भर दिला जातो. त्यामुळे इतर शाखांच्या तरुणांना फारसा वाव मिळत नाही. तरीही काही तरुणांना मात्र या नोंदणीचा फायदा होतो.
- राजू इंगोले, बेरोजगार,जांब
शासनाने विविध प्रकारची भरतीच मागील काही वर्षांपासून बंद केल्यात जमा आहे. शिक्षकांच्या तर जागाच निघत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्वयंरोजगाराच्या माध्यमातून प्रयत्न केले तर तेथेही अनंत अडचणी आहेत. नोंदणी करूनही त्याचा काहीच फायदा नाही.
- गजानन जगताप, बेरोजगार, हिंगोली