हिंगोली : दिल्ली येथील जंतर-मंतर येथे काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाचे प्रत जाळली तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरून घोषणाबाजी केल्याच्या निषेधार्थ आज नांदेडनाका मुख्य रस्त्यावर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.
दिल्ली येथील घटनेचे पडसाद हिंगोलीत उमटत आहेत. समाजकंटकांनी जाणीवपूर्वक हे कृत्य करून त्याचा व्हिडिओ व फोटोही सोशल मीडियावर टाकून प्रसिद्धी केली. जातीय द्वेष पसरविण्याच्या उद्देशाने हे कृत्य करण्यात आले आहे. त्यामुळे संविधानाचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून आरोपींना कडक शासन करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. तसेच पोलीस निरीक्षक हिंगोली शहर यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग होता.
या प्रकरणी आरोपीला कडक शासन करण्याच्या मागणीचे १० आॅगस्ट रोजीही विविध आंबेडकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने सादर केली. निवेदनावर प्रकाश इंगोले, मिलींद उबाळे, योगेश नरवाडे, किरण घोंगडे, अमित कळासरे, स्वप्निल इंगळे, विक्की कशिदे, बंडू नरवाडे, प्रकाश मगरे, विक्की खंदारे, आनंद धुळे, सुजय देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.