हिंगोली : शहरातील जलेश्वर तलाव परिसरातील अतिक्रमण हटविण्यास शनिवारी सकाळी ७ वाजेपासून सुरुवात करण्यात आली.
जलेश्वर तलाव परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी हा तलाव अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण धारकांना २९ फेब्रुवारी रोजी नोटीसा बजावण्यात आला होत्या. तर १ मार्च रोजी नगरपालिका, महसूल विभाग, भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीमांकन निश्चित करण्यात आले. यावेळी अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. ज्या अतिक्रमणधारकांनी सूचनेनंतरही अतिक्रमण काढून घेतले नाही त्यांचे अतिक्रमण २ मार्च रोजी सकाळपासून हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, जवळपास ४०० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा ही या परिसरात उपस्थित आहे.
सकाळी ११ वाजेपर्यंत जवळपास ३० जणांचे अतिक्रमणे आढळण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी दिली. तलाव परिसरात जवळपास २०० जणांनी अतिक्रमणे केली आहेत.