लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालय नेहमीच वेग- वेगळ्या अडचणीने चर्चेत राहते. येथे अधून - मधून उद्भवणारा पाण्याचा प्रश्न काही केल्या मार्गी लागत नाही. आता तर चक्क शस्त्रक्रिया विभागातच पाणी नसल्याने रात्रीच्या वेळी प्रसुती आलेल्या महिलाची मोठी हेळसांड होण्याची शक्यता आहे.हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध प्रकारच्या समस्याने रुग्ण चिंताग्रस्त झाले आहेत. समस्या सोडविण्यासाठी पाहिजे त्या उपया योजनाच केल्या जात नसल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्रास सहन करतच उपचार घ्यावा लागत आहे. त्यातच अतिशय महत्वाचा मानला जाणारा पाणीप्रश्न रुग्णांसह डॉक्टरांची डोकेदुखी बनत आहे. येथे ८ मेपासून पाणीटंचाई असल्याने रुग्णालयातील बोअर किंवा टँकरवर काम सुरु आहे. रुग्ण पाण्यासाठी ओरडत असले तरीही त्यांच्याकडे लक्ष दिले जात नाही. आता तर चक्क शस्त्रक्रिया विभागात पाणीच नसल्याने रुग्णावर शस्त्रक्रिया करावी तरी कशी? हा प्रश्न डॉक्टरांसमोर उभा राहिला आहे. वारंवार ते येथील संबंधितांना पाणी नसल्याचे सुचवित आहेत. मात्र त्याच्याकडेही कोणीच लक्ष देत नसल्याने अजून तरी तो प्रश्न सुटलेला नाही. तर येथे काम करणाºया प्लंबरने ८ मे रोजीच शल्यचिकित्सक यांना पालिका पाणी कमी प्रमाणात सोडत असल्याचे लेखी कळविले होते. मात्र त्यावर पुढे काहीच कार्यवाही झाली नसल्याने पाणीप्रश्न जसाच्या तसाच राहिला. रुग्णालयाला दिवसाकाठी १ ते दीड लाख लिटर पाणी लागत असते, मात्र पालिकेकडून केवळ २५ ते ३० हजार लिटरच पाणी सोडले जाते. त्यामुळेही अडचण कायम आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयातील पाण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. तेथून पाण्याची मागणी येताच त्यांच्या मागणीनुसार मुबलक प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याचे पालिका पाणी पुरवठा विभागाचे अभियंता महादेव बळवंते यांनी सांगितले.येथील पाणीप्रश्नाकडे मी स्वत: लक्ष देतो, रुग्णांची पाण्यासाठी जराही हेळसांड होऊ नये म्हणून पाणीपुरवठा करणाºया संबंधितच्या संपर्कात राहतो. पाईप लाईनला गळती असलेल्या ठिकाणाची स्वत: पाहणी करुन घेतो. पण समस्या उद्भवलेली नसल्याचे अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. मंगेश टेहरे यांनी सांगितले. नंतर मात्र सुटीवर असल्याचे सांगून वेळ मारून नेली.
शस्त्रक्रिया विभागात पाण्याचा ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:41 AM