हिंगोली : अलीकडच्या काळात सुलभ व वेगवान संपर्क माध्यम म्हणून शासकीय कामकाजात मोबाईल वापर अपरिहार्य बनला आहे. परंतु, बहुतांशवेळा मोबाईलचा आवाज मोठ्या प्रमाणात ऐकीवात येत आहे. त्यामुळे यास आवर घालण्यात यावा, अशी सूचना राज्याच्या सचिवांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिली आहे.
राज्याचे सचिव इंद्रा मालो यांनी २३ जुलैरोजी एक परिपत्रक काढले असून, मोबाईल शिष्टाचाराबाबत ११ धडे दिले आहेत. मोबाईल वापराबाबत काहीवेळा संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित शिष्टाचार पाळण्यात येत नाहीत. हे कळाल्यानंतर अशाप्रकारच्या वर्तणुकीमुळे शासनाची प्रतिमा काही प्रमाणात मलीन होऊ शकते, हे निदर्शनास आल्यामुळे मोबाईल शिष्टाचाराबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना केली आहे.
कार्यालयीन वेळेत कामासाठी आवश्यक असेल तेव्हाच मोबाईलचा वापर करावा, मोबाईलवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा बोलावे, इतरांशी बोलतेवेळी वाद घालू नये. तसेच असंसदीय भाषेचा वापर मुख्य करून टाळणे गरजेचे आहे. कार्यालयीन काम करताना इतरांशी बोलतेवेळी थोडक्यात आपले म्हणणे समोरच्या व्यक्तीस पटवून देणेही महत्त्वाचे आहे.
दौऱ्यावर असताना मोबाईल बंद ठेवू नये...
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात चालू असलेल्या बैठकीदरम्यान संदेश तपासणे, व्हॉटस-ॲप पाहणे, या बाबी टाळणे तितकेच महत्त्वाचे आहे. दुसरीकडे बहुतांश अधिकारी, कर्मचारी हे दौऱ्यावर असताना मोबाईल बंद ठेवतात, असे निदर्शनास आल्यामुळे त्यांनी मोबाईल शिष्टाचार पाळत आपला मोबाईल दौऱ्यावर असताना बंद ठेवू नये, अशा सूचनाही सचिव इंद्रा मालो यांनी दिल्या आहेत.