हिंगोली : शहरालगतच्या रामाकृष्णानगर येथील एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी सोने व चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना १३ ते १७ जुलै रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी १९ जुलै रोजी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकुळ सुरूच असून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील रामाकृष्णा नगर येथील सेवानिवृत्त सपोउपनि किशन आनंदराव राठोड यांच्या घरी चोरी झाली. चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले ७८ हजार रूपये किंमतीचे सोने व चांदीचे दागिने लंपास केले. यापुर्वीही येथील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात चोरी झाली होती. परंतु चोरटे मात्र अद्याप फरारच आहेत. पोलिसांच्या घरी जर चोरी होत असेल तर इतर सामान्य जनतेचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
त्यात आता परत येथील एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्याच घरी चोरी झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत सर्रासपणे चोरीच्या घटना घडत आहेत. परंतु आरोपी मात्र मोकाटच आहेत. हिंगोली शहरालगतच्या रामाकृष्णानगर येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी किशन राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोनि ए. डी. सुडके हे करीत आहेत.