हिंगोली : खरीप हंगाम तोंडावर आल्याने अनेक शेतकऱ्यांनी खते व बियाणे खरेदी केले. यात हजारो शेतकऱ्यांना वाढीव दराने खते खरेदी करावी लागली. अशांची रक्कम परत करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी कार्यालयात ठिय्या देण्यात आला. यावेळी सेनगाव कृषी कार्यालयाचे पथक पाठवून दुकानदारांना रक्कम परत करायला लावू, असे आश्वासन अधीक्षकांनी दिला.
हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून शेतकरी खते, बी- बियाणे खरेदीसाठी धडपडत आहे. यात अनेक शेतकऱ्यांनी पुढे टंचाई निर्माण होण्याच्या भीतीने आधीच खरेदीला प्राधान्य दिले. दरम्यान, शासनाने नवीन खतांची दरवाढ केली. जिल्ह्यात जुन्या खताचा साठा असतानाही अनेकांनी या नवीन खताची विक्री केली. नंतर शासनाने ही दरवाढ मागे घेतली. मात्र या शेतकऱ्यांना तर दरवाढीचा फटका बसला आहे. अनेक गावांतून याबाबत तक्रारी असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी अधीक्षक कार्यालयात शुक्रवारी निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले की, जर शेतकऱ्यांना ही रक्कम परत मिळाली नाही तर स्वाभिमानीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. या शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षकांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला. त्यानंतर अधीक्षक विजय लोखंडे यांनी कुठल्या तक्रारी आहेत, याबाबत विचारणा केली असता सेनगावच्या आढळल्या. त्यामुळे सेनगाव येथील कृषी कार्यालयाचे पथक पाठवून संबंधित शेतकऱ्यांची रक्कम परत करण्यास भाग पाडू, असे सांगितले. तसेच सेनगावला जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे व कार्यकर्त्यांनी सेनगावला जाण्याची तयारी सुरू केली होती.
यावेळी पतंगे यांनी आम्हाला कृषी अधीक्षकांनी साधे आतमध्ये येऊनही चर्चा करू दिली नाही. केवळ सेनगावला पाठवून हात झटकल्याचा आरोप केला आहे. तसेच विमा कंपनीनेही एनडीआरएफच्या निर्देशांनुसार विमा अदा केला नाही. त्यामुळे काहींना केवळ ८०० रुपये मिळाल्याचे सांगितले. याबाबतही प्रशासन काहीच बोलत नसल्याचे ते म्हणाले.