दसरा, दिवाळी सणाला झेंडू फुलांची वाढती मागणी यासाठी हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हे हंगामी पिकांसह जोड व्यवसाय म्हणून झेंडू फुलांची लागवड करतात. गेल्या वर्षी हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झेंडू फुलांची लागवड केली होती. पण शेतकऱ्यांच्या झेंडू फुलाला भाव कमी मिळाला होता. यामुळे यावर्षी झेंडूची लागवड कमी प्रमाणात केली.
असुनयावर्षी तरी झेंडूला चांगला भाव मिळेल यासाठी झेंडू उत्पादक शेतकऱ्यांनी झेंडू फुलांच्या बागेचे संगोपन केले पण जिल्ह्यात परतीच्या पावसाने झेंडूच्या बागा जमीन दोस्त झाल्या असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. दसरा सण चार दिवसांवर आला असून झेंडू फुलाला चांगला भाव मिळेल या आशेवर शेतकरी असताना शेतकऱ्यांच्या आशेवर परतीच्या पावसाने पाणी फेरले आहे.
एकीकडे सोयाबीन पिकांवर येलो मोझॅक रोगामुळे सोयाबीन उताऱ्यात मोठी घट झाली आहे. तर दुसरीकडे परतीच्या पावसाने झेंडूचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. तर दुसरीकडे दसरा, दिवाळी सण तोंडावर असल्याने शेतकऱ्यांनी दिवाळी आनंदात साजरी करण्यासाठी सरकारने पुढाकार घेऊन मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.