हिंगोली : दोन वर्षांपूर्वी झालेल्या हत्याकांडाचे कारण समोर करून आरोपींनी नामदेव खंडोजी कवडे (७०, रा. दाताडा) या वृद्धाच्या पोटात व मानेवर चाकूने घाव करून त्याची हत्या केली. हा थरार दाताडा बु. (ता. सेनगाव) शिवारात ९ सप्टेंबर रोजी घडला. याप्रकरणी पोलिसांनी ६ आरोपींवर १० सप्टेंबर रोजी विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
नितीन विश्वनाथ कवडे यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, अमोल कैलास शिंदे, मच्छिंद्र झनकराव शिंदे, प्रदिप झनकराव शिंदे, महादेव शिंदे, भुजंग शिंदे (सर्व रा. दाताडा) आणि नारायण थिट्टे (रा.हत्ता, सेनगाव) यांनी दाताडा बु. शिवारात बटईने केलेल्या शेतात येऊन दोन वर्षांपुर्वी झालेल्या कैलास शिंदे हत्याकांडाचे कारण समोर करून वाद घातला. यावेळी नामदेव खंडोजी कवडे यांच्या पोटात व गळ्यावर चाकूने घाव केले.
जखमी अवस्थेत त्यांना दवाखान्यात नेत असताना आरोपींनी शिविगाळ केली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी नमूद सहाही आरोपींविरूद्ध कलम ३०२, १४७, १४८, १४९, ३२४, ५०४ अन्वये गुन्हे दाखल केले. यातील आरोपी फरार आहेत. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजणे, आश्विनी जगताप, ठाणेदार सरदारसिंग ठाकूर, पोउपनि अभय माकने यांनी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोनि सरदारसिंग ठाकूर करित आहेत.