लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानात हिंगोली जिल्ह्यातून निवडलेल्या दहा गावांचा आढावा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी घेतला. या गावांत कामेच होत नसल्याचा प्रश्न लोकमतमधून मांडण्यात आल्यानंतर या गावांत प्रत्यक्ष उपायांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.यामध्ये औंढा तालुक्यातील देवाळा तुर्क पिंपरी, सावळी बै., हिंगोली तालुक्यातील जांभरुण आंध, व तांडा, सेनगाव तालुक्यातील गोंडाळा, जामदया, खिल्लार, लिंगदरी, जामठी बु., सूरजखेडा या गावांचा समावेश आहे. या सर्व गावांत ४५ जलस्त्रोत आहेत. त्यापैकी २९ स्त्रोतांची प्रयोगशाळा तपासणी केली. त्यात १२ स्त्रोत पिण्यास अयोग्य आढळले. नायट्रेट व फ्लोराईडचे प्रमाण जास्त आहे. शिवाय या गावांतील पाणीपातळीही दोन ते पावणे तीन मीटरने खालावली आहे. गतवर्षी देवाळा व सावळी वगळता इतरत्रच अशी परिस्थिती होती. यंदा सगळीकडे हे चित्र आहे. या गावांत आता सव्वा कोटींची कामे प्रस्तावित केली. यात रिचार्ज शाफ्टची सावळी व सूरजखेडा वगळता प्रत्येक गावात १0 अशी ८0 कामे तर रिचार्ज ट्रेंचची सर्व गावांत मिळून ३२ कामे प्रस्तावित केली आहेत. सिमेंट नाला बांध व भूमिगत बंधाऱ्याची ८ कामे प्रस्तावित केली आहेत. ही कामे लवकर पूर्ण करण्यास आदेशित केले आहे.
सामाजिक ग्रामपरिवर्तन अभियानाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:17 PM