लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : देशाची पुनर्रचना करणारी व्यवस्था म्हणजे भारतीय संविधान आहे. आधुनिक पद्धतीने विचार करण्याची संधी ही या देशाची राज्यघटना आम्हा सर्वांना देत आहे, असे प्रतिपादन बौद्ध सांस्कृतिक मंडळद्वारा संचलित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना डॉ. सुरेश माने यांनी केले. ‘भारतीय संविधानाची अंमलबजावणी एक राष्ट्रीय आव्हान’ या विषयावर ते बोलत होते.देशाच्या भविष्याची मांडणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केलेली आहे. भारतीय संविधानाची अंमलबजावणी हे फार मोठे आव्हान आहे हे विषद करताना ते म्हणाले की, कलम ४५ नुसार दहा वर्षांच्या आत १४ वर्षांखालील सर्व मुला-मुलींना मोफत शिक्षण मिळाले असते तर या देशाचा चेहरा बदललेला दिसला असता. त्यामुळे अनियंत्रित आणि बेलगाम राज्यसत्ता हे या संविधानाला मान्य नाही. तर या देशाचे संविधान हे पुनर्रचनाचा आराखडा आहे. खरेतर संविधानाच्या योग्य अंमलबजावणीतच या देशाचे हित आणि विकास आहे, असे ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्ध सांस्कृतिक मंडळाचे प्रा. डॉ. शत्रुघ्न जाधव तर उद्घाटक अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोनि सुधाकर आडे, तसेच मंडळाचे संस्थापक सदस्य- एस. एस. बडोले, निवृत्ती सरकटे, डी. एन. जाधव, युवराज खंदारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शत्रुघ्न जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन कैलास भुजंगळे यांनी केले. त्रिशरण व पंचशील अशोक इंगोले यांनी म्हटले. यशस्वीतेसाठी मंडळाचे सहसचिव प्रा. डॉ. किशोर इंगोले, उपाध्यक्ष सुभाष भिसे, कोषाध्यक्ष सुरेश झिंझाडे, सदस्य प्रा. डॉ. सचिन हटकर, भीमराव कुरवाडे, मनोहर वाकळे प्रा. आशिष इंगळे, अंतिदास इंगोले आदींनी परिश्रम घेतले. व्याख्यानमालेस मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
भारतीय संविधान हे पुनर्रचनेचा आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:29 AM