लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : शालार्थ प्रणालीत नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी स्थापन करण्यात आलेला विशेष कृतीदल संपुष्टात आला असून आता हे अधिकार शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले आहेत.याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे उपसचिव चारुशिला चौधरी यांनी २० मार्च रोजी या बाबत परिपत्रक काढले आहे. शालार्थ प्रणालीत नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी शिक्षण आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कृतीदल स्थापन करण्यात आले होते. कृती दलाने मंजुरी दिल्यानंतरच नवीन नाव शालार्थ प्रणालीत समाविष्ट केल्या जायचे, ही प्रकरणे मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहिल्याने हे प्रस्ताव शिक्षण संचालकाकडे विभागून देण्यात आले होते. सदरचे प्रस्ताव निकाली न झाल्याने आता विशेष कृती दलाची आवश्यकता नसल्याचे शिक्षण आयुक्तांनी कळविले आहे. तसेच शालार्थ क्रमांक देण्याबाबतचे अधिकार विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या स्तरावर देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांनी दिलेल्या वैयक्तिक मान्यतेबाबत त्याच विभागातील विभागीय शिक्षण उपसंचालक हे शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत निर्णय घेतील. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी दिलेल्या वैयक्तीक मान्यतेच्या अनुषंगाने महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ हे शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत निर्णय घेणार आहेत. पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त होणाऱ्या शिक्षकांचे नाव जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक हे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करतील. अनेक शिक्षकांना वैयक्तिक मान्यता मिळूनही त्यांचे नाव शालार्थ प्रणालीत समाविष्ट करण्यात आले नसल्याने त्यांचा वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. आता हे अधिकार शिक्षण उपसंचालकांकडे आली आहेत.
नाव समाविष्ट करण्याचे अधिकार आता ‘शिक्षण उपसंचालकांना’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:15 AM