हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेणे खूप गरजेचे असल्याने शाळा सुरू करण्याचे सर्व अधिकारी जिल्हाधिकारी, ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समितीला दिल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
शाळा कधी सुरू होतील, याची पालकांना उत्सूकता असल्याच्या पार्श्वभूमीवर त्या म्हणाल्या, ‘‘शाळा सुरू करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना आधीच दिल्या होत्या. मात्र, त्यासाठी स्थानिक परिस्थिती जास्त महत्त्वाची आहे. त्यात कोणताही धोका पत्करता येणार नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीवर हा निर्णय सोपविला. शाळा सुरू करण्यापूर्वी पालकांमध्ये विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे.’’
खाजगी इंग्रजी शाळांच्या शुल्कवाढीच्या मुद्यावर त्या म्हणाल्या, आम्ही यासंदर्भात शासन आदेश काढला होता. यात शाळांनी शुल्क वाढवू नये व पालकांना सध्या आर्थिक चणचण असल्याने तूर्त सक्ती करू नये. टप्प्याटप्प्याने शुल्क घेण्यास सांगितले होते. मात्र, त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागितली असल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून त्यावर भाष्य करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यासह राज्यात शिक्षण विभागात असलेल्या रिक्त पदांबाबत विचारले असता ही वस्तूस्थिती असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, यासाठी शिक्षण विभागाने कार्यवाही सुरू केली होती. या जागा तातडीने भरणे गरजेचे होते. मात्र, कोरोनाचे संकट आल्यानंतर ही प्रक्रिया काहीशी मागे पडली. मात्र, हे सावट दूर झाल्यानंतर हा विषय प्राधान्याने निकाली काढला जाणार आहे. शासन याबाबत गंभीर आहे.