सेनगाव: येथील एका फार्मर प्रोड्यूसर कंपनीमध्ये सीईओ पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यानेच १३ लाखांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याने ११ शेतकऱ्यांचा २३२ क्विंटल हरभरा परस्पर विक्री केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या विरुध्द मंगळवारी ७ मे रोजी रात्री उशीरा सेनगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
यासंबंधी अधिक माहिती अशी की, सेनगाव येथे शेतकऱ्यांच्या शेतीमाल खरेदी विक्री करण्यासाठी स्मृती महिला फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या कंपनीकडून शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करून त्यांना योग्य भाव दिला जातो. त्यानंतर या कंपनीला नाफेडचे खरेदी केंद्र देखील मिळाले. या ठिकाणी शेतकऱ्यांचा खरेदी केलेला शेतीमाल नाफेडकडे दिल्यानंतर त्यातून कंपनीला कमीशन मिळते शिवाय शेतीमालासही चांगला भाव मिळतो. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी या ठिकाणी हरभरा विक्री केला होता.
दरम्यान, या कंपनीचे सीईओ म्हणून कार्यरत असलेला सुरज प्रताप मोरे ( रा. वरुड चक्रपान ) याने १६ मे ते ११ सप्टेंबर २०२३ या कालावधीत या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी केला. मात्र, सदर खरेदी केलेला हरभरा नाफेडकडे पोहोचविण्याऐवजी त्याची परस्पर विक्री केली. यामध्ये ११ शेतकऱ्यांचा २३२ क्विंटल हरभरा पिकाचा समावेश आहे. त्यातून आलेल्या १३ लाख रुपयांचा अपहार केला. सभासदांनी नाफेडकडे हरभरा विक्रीच्या पैशाची चौकशी केली.
दरम्यान, या ठिकाणी विक्री केलेल्या हरभरा पिकाचे पैसे अद्याप बँक खात्यात जमा का झाले नाही? याची विचारणा करण्यासाठी शेतकरी कंपनीच्या खरेदी केंद्रावर आले होते. मात्र सुरवातीला सुरज याने त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर शेतकरी व कंपनीच्या काही सभासदांनी नाफेडकडे हरभरा विक्रीच्या पैशाची चौकशी केली. असता नाफेडकडे हरभरा आलाच नसल्याचे सांगण्यात आले. यावरून सुरज मोरे याने कंपनी व शेतकऱ्यांची फसवणुक केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी कंपनीचे कर्मचारी शेकुराव हागवणे यांनी मंगळवारी ७ मे रोजी रात्री सेनगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी सुरज प्रताप मोरे याच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संतोष तांबे, जमादार अशोक घुगे पुढील तपास करीत आहेत.