- चंद्रमुनी बलखंडेहिंगोली - पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या सूचनेनुसार हिंगोली शहर व परिसरात शनिवारी रात्री ११ ते रविवारी पहाटेपर्यंत कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले ५ जण ताब्यात सापडले. संशयित चोरट्यांनाही पकडण्यात पथकाला यश आले आहे.
हिंगोली शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून चोरटे सक्रिय झाले आहेत. शहराच्या कडेला असलेली घरे चोरट्यांचे टार्गेट ठरत आहे. त्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रात्रीची गस्त घालण्यासोबतच कोंबिं ऑपरेशन राबविण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने शनिवारी रात्री कोंबिंग ऑपरेशन राबविले. हे पथक हिंगोली शहरातील रामाकृष्णा मार्केट परिसरात रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आले असता एका मोकळ्या जागेत काहीजण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. पोलिस येत असल्याचे दिसताच ते पळून जात होते. मात्र पोलिसांनी पाठलाग करून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी शत्रु पुंजाजी चव्हाण (रा. खरबी ता. हिंगोली), अमोल संतोष पवार (रा. पारधीवाडा हिंगोली), चंदू जगन काळे (रा. पारधीवाडा हिंगोली), काशिनाथ विठ्ठल काळे (रा. पारधीवाडा हिंगोली), सुरज धुरपत चव्हाण (रा.पारधीवाडा हिंगोली) अशी नावे सांगितली. त्यांची झडती घेतली असता त्यांचेकडे लोखंडी खंजर, रॉड, पकड, दोरी, मिरची पावडर आदी साहित्य आढळून आले. ही कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू, शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार वाठोरे, गजानन पोकळे, लिंबाजी वाहूळे, नितीन गोरे, ज्ञानेश्वर पायघन, विठ्ठल काळे, आझम प्यारेवाले, हरिभाऊ गुंजकर, महादू शिंदे आदींच्या पथकाने केली.
हद्दपार व्यक्तीसह कोयता जप्तहिंगोली शहरचे सहायक पोलिस निरीक्षक मांजरमकर, पोलिस उपनिरीक्षक कपील आगलावे, पोलिस अंमलदार संभाजी लेकुळे, अशोक धामणे, क्षीरसागर, संतोष कुरे, संजय मार्के, गणेश लेकुळे आदींच्या पथकानेही हिंगोली शहरात तपासणी केली. या पथकाला मस्तानशहा नगरात पवन सुरेश ठोके (रा. मस्तानशहानगर) याचेजवळ एक लोखंडी कोयता आढळून आला. इंदिरा गांधी चौक परिसरात शाहरूख खान हाफीज खान पठाण (रा. सेनगाव) हा एखादा गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसल्याचे आढळून आला. हिंगोली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेल्या प्रदिप बाबूराव खंदारे (रा. अण्णाभाऊ साठे नगर हिंगोली) यास मच्छिमार्केट परिसरातून ताब्यात घेण्यात आले. पेन्शनपुरा भागात अकरम खॉ रहेमत खॉ पठाण (रा.पेन्शनपुरा) याच्याजवळून कोयता जप्त केला.तसेच औंढा रोड परिसरातून राहूल रोशन चव्हाण (रा. पारधीवाडा हिंगोली) हा चोरी, घरफोडी सारखा गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसल्याचे आढळून आला.