हिंगोली : तालुक्यातील बासंबा येथून चोरट्यांनी एका घरातून एक लाख १० हजार रूपयांचे सोन्या, चांदीचे दागिने लंपास केल्याची आज पहाटेच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बासंबा येथील झोपडपट्टी परिसरातील रहिवासी निवृत्ती संभाजी कुरवाडे हे रात्री त्यांच्या कुटुंबासह उकाडा जाणवत असल्यामुळे घरासमोर झोपले होते. दरम्यान, चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत दगडाच्या मदतीने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी घरातील पेटीत ठेवलेले सोन्या- चांदीचे दागिने लंपास केले. यासह नगदी २० हजार रूपये असा एकूण १ लाख १० हजार रूपयांचा ऐवज चोरी केला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर, रामराव पोटे, अशोक काकडे, संजय वाढवे, पुंजाजी पिंपरे यांच्यासह श्वान पथकातील अर्जुन यादव, लिंबाजी सदावर्ते यांच्यासह फिंगर प्रिंट एक्सपर्ट डी.एन. मोरे, सुदाम राठोड, आकाश बोस यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. या संदर्भात निवृत्ती कुरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बासंबा पोलीस अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पी.के. कांबळे हे तपास करीत आहेत.