- रमेश कदम आखाडा बाळापूर (जि.हिंगोली): नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर दाती फाटा जवळ वाहनचालकास रस्ता अडवून लुटण्याची घटना घडली आहे . तोंड बांधलेल्या सशस्त्र ६ जणांनी एका दुचाकीला अडवून चाकूचा धाक दाखवत त्यांच्या जवळील रोख रक्कम व मोबाईल असा २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून घेतला. या प्रकरणी ६ चोरट्याविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाती फाटा जवळ राष्ट्रीय महामार्गावर गॅस एजन्सी च्या गोडाऊन समोर रस्ता अडवून लुटण्याची ही घटना दिनांक १० ऑगस्ट रोजी रात्री १०:२३वाजण्याच्या सुमारास घडली आहे. आखाडा बाळापूर येथून दवाखान्यातून भोसी गावाकडे दुचाकीने दोघेजण निघाले होते.
त्यावेळी रात्री रस्त्यात तोंडाला रुमाल बांधलेल्या ६ जणांनी चाकूचा धाक दाखवून दुचाकी थांबवली. चाकूने व दगडाने मारहाण करत जखमी केले . त्यांच्या जवळील नगदी १० हजार रुपये व मोबाईल असा एकूण वीस हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला आहे. या प्रकरणी भोसी येथील रहिवासी राजेश पांडुरंग अवचार यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम ३९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार करीत आहेत.
वाहतूक विभागाचे महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक रवींद्रकुमार सिंघल यांनी नुकतीच राष्ट्रीय महामार्गावरील येलकी येथील महामार्ग पोलिसांच्या चौकीला भेट दिली होती. चोरट्यांनी 'त्याच' चौकीजवळ लुटल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.