हिंगोली : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या संशयित टोळीला पोलिसांनी पकडले. त्यांचेकडून मिरची पावडर, छऱ्याची एअर पिस्तूल, पहार, सुरा, कत्ता आदी साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई वसमत येथील आसेगाव रोड परिसरात १ जून रोजी मध्यरात्री १२:१५ वाजता करण्यात आली.
वसमत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम, पोलिस उपनिरीक्षक राहूल महिपाळे, पोलिस अंमलदार हकीम, जोंधळे, गुंडरे, राहूल राठोड, वाघमारे, ढेपे, आसपाक यांचे पथक गुरूवारी रात्री वसमत शहरात गस्त घालत होते. यावेळी शहरातील आसेगाव रोडवरील साईनगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत रिकाम्या प्लाटमध्ये काहीजण संशयास्पद स्थितीत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.पोलिसांना पाहताच ते पळून जात होते. त्यावरून पोलिसांचा संशय बळावला. लागलीच पथकाने पाठलाग करून तिघांना पकडले तर दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले.
यावेळी मिरची पावडर, काळ्या रंगाची छऱ्याची एअर पिस्तूल, एका झुडूपात पहार, एक लाकडी मुठ असलेला सुरा, एक कत्ता, पांढऱ्या रंगाची सुताची दोरी असे साहित्य जप्त केले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक राहूल महिपाळे यांच्या फिर्यादीवरून अक्षय पिराजी पवार, बाबा नागोराव गोरे, बालाजी उर्फ सिन्ना नागोराव गोरे, शिवा यलप्पा गुंडाळे (चौघेजण रा. कारखाना रोड वसमत), शेख अहमद उर्फ कन्नी शेख नसीर (रा. मुशाफीर शहा मोहल्ला वसमत) याचेवर वसमत शहर पोलिस ठाण्यात २ जून रोजी पहाटे ३ च्या सुमारास गुन्हा नोंद झाला. यातील तिघांना ताब्यात घेतले असून दोघेजण पळून गेले आहेत. पोलिस उपनिरीक्षक एस.बी. भोसले तपास करीत आहेत.