लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : खरीप आणि रबी दोन्ही हंगाम हाती लागले नसल्याने सेनगाव गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. महिनाभरात रोजगाराच्या शोधात तालुक्यातील वीस हजारांहून अधिक मजुरांचे स्थलांतर झाले आहे. मजुरांच्या हाताला काम देणारी रोजगार हमी योजनाही दुष्काळात सापडली असून तालुक्यात या योजनेंतर्गत नाममात्र वीस कामगार काम करीत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अवेळी ६४ मिमी पाऊस पडला. त्याचा मोठा परिणाम खरीप पिकावर झाला. परतीच्या पावसानेही दगा दिल्याने सोयाबीनसह तूरही हातची गेली. तालुक्यात केवळ २० टक्के क्षेत्रावर रबीची पेरणी झाली आहे. अत्यंत गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पिण्याच्या पाण्यासह रोजगाराचाही प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाने सेनगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला, परंतु त्या अंनुषगाने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत, रोजगाराच्या शोधात हजारो मजूर दररोज स्थलांतर करीत आहेत. गत महिनाभरात तालुक्यातून तब्बल वीस हजाराहून अधिक मजुरांनी रोजगाराच्या शोधात शहराकडे, ऊसतोडणीसाठी स्थलांतर केले आहे. दुष्काळी स्थितीची दाहकता दररोज तीव्र होत आहे. दिवाळी सणावर मोठ्या प्रमाणात दुष्काळाचे सावट जाणवले. खरीप पिकांच्या उत्पादनातून खर्चही निघाला नसल्याने शेतकरी, शेतमजूर आर्थिक टंचाईने ग्रस्त झाले आहेत. या विवंचनेने रोजगाराच्या शोधात अनेकांनी घरे सोडली असताना प्रशासन मात्र कमालीचे बेफिकीर आहे. दुष्काळ परिस्थितीत मजुरांच्या हाताला काम देणारी रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीवरही दुष्काळाचे सावट पसरल्याने रोहयोची कोणतीही कामे तालुक्यात अद्याप सुरुच झाली नाहीत. यामुळे दुष्काळग्रस्त तालुक्याला शासनाने एकप्रकारे वाऱ्यावरच सोडले आहे. तालुक्यात नोंदणीकृत १८ हजार ६२२ मजूर आहेत. त्यापैकी पाच घरकुल योजनेचा कामावर केवळ वीस मजूर कार्यरत आहेत. त्यामुळे कधी नव्हे, एवढा गंभीर दुष्काळाचा सामना तालुक्यातील सर्वसामान्य जनता करत असताना प्रशासन मात्र प्रत्यक्षात दिलासा देणारा कोणत्याच उपाययोजना करीत नसल्याने दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस तीव्र होत असून दररोज शेकडो लोंढे रोजगाराच्या शोधात स्थलांतर करीत असल्याचे भीषण चित्र पाहावयास मिळत आहे.
रोहयोच्या कामांचाही दुष्काळ; वीस हजारांवर मजुरांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:12 AM