हिंगोली : नववी ते बारावी तसेच महाविद्यालयीन वर्ग सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. माध्यमिक विभागाकडून जवळपास २८३७ शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याबाबत आदेश देण्यात आला आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनीही स्वतंत्र आदेश काढून विविध सूचना दिल्या आहेत.
हिंगोली जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यासाठी तेथील शिक्षक व कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य आहे. यासाठी जिल्हा आरोग्य अधिकऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना आरटीपीसीआर चाचण्यांसाठी स्वॅब घेण्यास आदेशित केले. १९ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत ही चाचणी करून घ्यायची आहे. माध्यमिकच्या २२७० तर उच्च माध्यमिकच्या ३६१ जणांची चाचणी करण्यात येणार आहे.
२१४ माध्यमिक शाळाहिंगोली जिल्ह्यात माध्यमिकच्या शाळांची एकूण संख्या २१४ एवढी आहे. यात अनुदानित शाळा ९२, विनाअनुदानित शाळा २३, अंशत: अनुदानित शळा १५, स्वयंअर्थसहायित शाळा ३२, जिल्हा परिषदेच्या शाळा २९ आहेत. तर जवाहर नवोदय विद्यालय व सैनिकी शाळाही प्रत्येकी १ आहे. याशिवाय आश्रमशाळाही २१ असून या ठिकाणच्या शिक्षक कर्मचाऱ्यांची चाचणी होईल.
उच्च माध्यमिकच्या अवघ्या ११२ शाळाहिंगोली जिल्ह्यात उच्च माध्यमिकच्या अवघ्या ११२ शाळा आहेत. त्यातही अनुदानित १९, विनाअनुदानित ८४, स्वयंअर्थसहायित ७ तर २ आश्रमशाळा आहेत. अंशत: अनुदानित, जिल्हा परिषदेची शाळा नाही. तर जवाहर नवोदय व सैनिकी शाळेतही उच्च माध्यमिक नाहीत. यांचे एकूण ३६१ शिक्षक व कर्मचारी हजर राहतील.
अशी आहे विद्यार्थी संख्याहिंगोली जिल्ह्यात माध्यमिकचे नववी ते दहावीचे एकूण विद्यार्थी ३८ हजार ९२६ आहेत. यात मुले २०४१५ तर मुली १८५११ आहेत. यातील शासकीय ६३५, जि.प.चे ४२९४, खाजगी अनुदानित २९५५५, खाजगी विनाअनुदानित १९१३, स्वयंअर्थसहायित २५२९ आहेत. तर ११ वी १२ वीचे २७ हजार ४४ आहेत. यात मुले १४५२७ तर मुली १२५१७ एवढ्या आहेत.
पालकांची संमती आवश्यकहिंगोली जिल्ह्यात शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक व कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. त्याचप्रमाणे मुलांनाही शाळेत पाठविण्यापूर्वी पालकाची लेखी संमती घेणे आवश्यक केले आहेत. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी याबाबत पुन्हा आदेश काढले आहेत. संबंधित यंत्रणांनी यावर अंमल करून घ्यायचा आहे.
कोरोनाविषयक काळजी घेण्याच्या सूचनाहिंगोली जिल्ह्यात शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून शाळा सुरू करण्यासाठी सर्व संबंधित शाळांना सूचना दिल्या आहेत. सॅनिटायझर व इतर बाबी स्थानिक प्रशासन देणार आहे. त्यामुळे काही शाळांनी मांडलेली ही समस्याही दूर झाली आहे, असे शिक्षणाधिकारी पी.बी.पावसे म्हणाले.
आजारींनी येवू नयेशाळा सुरू झाल्यावर मुलांची चाचणी होणार नाही. त्यामुळे आजारी मुलांनी शाळेत येवू नये, असे म्हटले आहे. त्यामुळे याकडे लक्ष ठेवावे लागेल.