- आयुब मुल्ला हिंगोली : कोल्हापुरी फेट्यांचा रुबाब, हलगी-घुमक्याच्या ठेक्यावरील लेझीम आणि नेत्रदीपक कुस्ती, तलवारबाजी, लाठीकाठी, दांडपट्टा, भाला लढत, पट्टा लढत, लिंबू कापणे, डोक्यावर नारळ फोडणे, आदी मर्दानी खेळांतून, प्राचीन युद्धकलेच्या जिगरबाज प्रात्यक्षिकांनी कोल्हापूरकरांनी हिंगोलीत काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचे जंगी स्वागत केले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या नियोजनबद्ध अनोख्या स्वागताने राहुल गांधी चांगलेच भारावून गेले. शनिवारी हिंगोलीत केवळ कोल्हापूर काँग्रेसचीच चर्चा राहिली.राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा शनिवारी हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे आली. त्यांच्या स्वागतासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते पहाटे चारपासूनच रस्त्याच्या दुतर्फा एकत्र झाले होते. ‘कोल्हापुरी भगवे फेटे’ आणि भारत जोडो यात्रेचे टी-शर्ट परिधान करून सुमारे दहा हजार कार्यकर्त्यांमध्ये राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी उत्साह संचारला होता. आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, राजू आवळे, प्रा. जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, आदी कार्यकर्ते सुमारे दहा किलोमीटर यात्रेत सहभागी झाले होते.
‘मुझे कुस्ती देखनी है...’बलदंड शरीरयष्टी असलेल्या मल्लांकडे राहुल गांधी कुतूहलाने पाहत होते. त्यांनी थेट आखाडा गाठला. राहुल यांना पाहताच मल्लांनी शड्डू ठोकल्याने परिसरात आवाज घुमला. हे सगळे पाहून ‘मुझे कुस्ती देखनी है’ असा आग्रह त्यांनी धरला आणि शाहू आखाड्याचे पैलवान उमेश चव्हाण व बंटीकुमार या तगड्या मल्लांची खडाखडी सुरू झाली. सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या कुस्ती खेळाची महती त्यांना सांगितली.यावेळी राहुल गांधी यांना कोल्हापुरी फेटा बांधून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा भेट देण्यात आला. शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना राहुल यांनी पादत्राणे काढून सुसंस्कृतपणाचे दर्शन घडविले.