औंढा नागनाथ (हिंगोली ) : ११५० शेळ्या व मेंढ्या वाहनांतून निर्दयपणे कोंबून नेणारे ११ वाहने पोलिसांनी आज औंढा-जिंतुर रोडवर पकडली. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात ११ आरोपींविरूद्ध पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, औंढा-जिंतुर मुख्य रस्त्यावरून जनावरांना वाहनांतून निर्दयपणे कोंबून वाहतूक केली जात होती. यावेळी पोलिसांनी हे वाहने पकडून वाहनचालकाविरूद्ध कारवाई केली. जवळपास १ हजार १५० शेळ्या व मेंढ्यांची या वाहनांतून निर्दयपणे वाहतूक केली जात होती. एकूण ३४ लाख ५० हजार रूपये किंमतीची जनावरे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या दक्षतेमुळे जनावरांची सुटका झाली आहे. याप्रकरणी सपोउपनि बळीराम जुंबडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेख मुस्ताक शेख बशीर, शेख शकील शेख रियाज, दीपक महादु शेजवल, आरेफ मोमीन अब्दुल गणी यांच्यासह सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.