हिंगोली : मागच्या काही महिन्यांपासून एस. टी. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. यातच आता महामंडळाकडे पैसा नाही म्हणून वैद्यकीय बिलेही लटकली आहेत. त्यामुळे उपचारांवर झालेल्या खर्चासाठी पैसा आणावा तरी कोठून ? हा यक्ष प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे पडला आहे.
गत काही महिन्यांपासून पगारात अनियमितता आहे. दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे एस. टी. महामंडळाला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच डिझेलच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे एस. टी. महामंडळाकडे पैसाच नाही, असे महामंडळाचे म्हणणे आहे. त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांचे मात्र चांगलेच हाल होताना दिसून येत आहेत. पगारात अनियमितता आहे. त्यामुळे घर कसे चालवावे, हाही मोठा प्रश्न आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय बिले पाठविली आहेत. अनेकांची मंजूरही झाली आहेत. परंतु, पैसा नसल्या कारणाने ती थांबवून ठेवली आहेत.
जिल्ह्यातील एकूण आगार ३
वाहक ३२८
चालक ३१३
अधिकारी ७
कर्मचारी ८४५
वैद्यकीय बिले मिळेनात...
वैद्यकीय बिले दोन - दोन महिन्यांपासून लेखा विभागाकडेच पडून आहेत. काही कर्मचाऱ्यांचे ते मंजूरही झाले आहेत. परंतु, महामंडळाकडे पैसा नाही, हे कारण देऊन ती थांबवून ठेवली आहेत. त्यामुळे उपचारावर झालेला खर्च कोठून आणावा, अशी परिस्थिती आहे.
प्रतिक्रिया...
सध्या महामंडळाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. डिझेलचे भावही गगनाला भिडले आहेत. पैसा उपलब्ध झाला की, वैद्यकीय बिले वेळेवर काढली जातील. कर्मचाऱ्यांना त्रास होणार नाही.
-संतोष शिंगणे, विभागीय लेखाधिकारी
पगारात अनिमितता... पगार वेळेवर द्या हो
मागच्या दोन-दोन महिन्यांपासून एस. टी. कर्मचाऱ्यांच्या पगारात अनियमितता आहे. उसनवारी करुन घर चालवावे लागत आहे. कोरोना काळापासून कर्मचारी, चालक, वाहक अहोरात्र राबतात. कोरोनाच्या काळात मुंबई येथे जाऊनही काम केले आहे. मग पगार का वेळेवर होत नाही, हा प्रश्न आहे. पगार वेळेवर झाला तर घरही चालवता येते.
उपचारावर झालेला खर्च कोठून आणायचा?
वैद्यकीय बिले मंजूर होऊन अनेक महिने लोटले आहेत. आता उपचारावर झालेला खर्च कोठून आणायचा, हे कळायला मार्ग नाही. महामंडळाकडे पैसा नाही, हे कारण सरळपणे दिले जात आहे.
- ज्ञानेश्वर दराडे, कर्मचारी
वैद्यकीय बिले पाठविले की, नेहमीच ती थांबवून घेतली जात आहेत. दुसरीकडे सर्वांना सातवा वेतन आयोग आहे. एस. टी. मंडळाला तर तोही नाही. अशावेळी कर्मचाऱ्यांनी करावे तरी काय?
- राजेश्वर शेंडे, कर्मचारी